गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटूंना क्षुल्लक गोष्टींवरुन ट्रोल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा गोलंदाज इरफान पठाण याला आपल्या पत्नीसोबत फोटो काढल्यामुळे तर मोहम्मद शमीला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफही अशाच कट्टरतावाद्यांच्या ट्रोलला बळी पडला आहे.
मोहम्मद कैफने आपल्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला. खरंतर या फोटोत आक्षेप घेण्यासारखं काहीही नव्हतं. मात्र या फोटोवरुनही त्याच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलंय.
अनेक चाहत्यांनी बुद्धिबळ खेळणं इस्लाम धर्मात निषिद्ध असल्याचं सांगत कैफवर टिका केली.
अवश्य वाचा – ‘ट्रोल’भैरवांचा उच्छाद, मुलीचा वाढदिवस साजरा केल्याने मोहम्मद शमीवर टीका
याआधीही कैफवर योग केल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी टिका केली होती. गेले काही दिवस सोशल मीडियावर अशा प्रकारच्या ट्रोलिंगमध्ये वाढ झाली आहे. याआधीही इरफान पठाण, मोहम्मद शमीला अशाच ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. क्रिकेटपटूंनाही आपलं वैय्यक्तिक आयुष्य असतं. परंतु अशा प्रकारांमुळे आपण त्यांच्या खासगी आयुष्यात दखल घेत असल्याची कल्पना कोणत्याही चाहत्यांना राहत नाही. बऱ्याच वेळा क्रिकेटपटू अशा टिकेकडे दुर्लक्ष करतात, तर काही जण या टिकाकारांना पुरुन उरतात. कैफने या प्रकाराबद्दल अद्यापही आपली प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
अवश्य वाचा – तुला हे वागणं शोभतं का? इरफान पठाणचं चाहत्यांकडून ट्रोलिंग