भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वशैलीची ताकद काही औरच होती. त्याने भारतीय संघाला ICC च्या तीन बड्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे त्याला जागतिक स्तरावर सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानले जाते. भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली किंवा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वशैलीशी धोनीची कायम तुलना केली जाते. बहुतांश वेळा क्रिकेट तज्ञ्ज धोनीलाच झुकतं माप देताना दिसतात. पण नुकतीच धोनीच्या नेतृत्वाची तुलना भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्याशी करण्यात आली.

समालोचक आकाश चोप्रा याने त्याच्या लाइव्ह चॅट शो मध्ये फिरकीपटू पियुष चावला याला आमंत्रित केलं होतं.पियुष चावला हा भारतीय संघात असताना धोनीच्या नेतृत्वाखाली तर IPL मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघातून खेळला आहे. त्यामुळे या दोन कर्णधारांपैकी उत्तम कोण? असा प्रश्न आकाश चोप्राने पियुषला विचारला. त्यावर पियुष चावलाने थेट शब्दात उत्तर दिले. “मला तरी वाटतं की धोनी अधिक चांगला कर्णधार आहे. पण खरं पाहता दोघांची तुलना करणं योग्य नाही. कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे. दोघेही गोलंदाजांना पाठिंबा देतात. सामन्यात ते गोलंदाजाला हवी तशी गोलंदाजी करण्याची परवानगी देतात. गोलंदाज जर अगदीच चुकत असेल तर मग ते जवळ येऊन चर्चा करतात आणि गोलंदाजाला त्यांच्या प्रकारे गोलंदाजाला त्यांच्या म्हणण्यानुसार गोलंदाजी करण्याचा सल्ला देतात”, असे तो म्हणाला.

 

दरम्यान, पियुष चावला हा यंदाच्या IPL लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याला CSK ने ६.७५ कोटींना विकत घेतले. करोनाच्या लॉकडाउनआधी काही दिवस चेन्नईच्या संघाने सराव कॅम्प लावला होता. जुन्या खेळाडूंपासून नव्या खेळाडूंपर्यंत सारेच या कॅम्पमध्ये होते. याच कॅम्पबद्दल एक गमतीदार प्रसंग फिरकीपटू पियुष चावलाने सांगितला होता. चेन्नईच्या सराव सत्रासाठी धोनी आणि सुरेश रैना उपस्थित होते. फलंदाजीचा सराव सुरू होता. त्यावेळी पियुष चावलाने सुरुवातीला बचावात्मक खेळ करायला सुरुवात केली. त्यावेळी धोनीने त्याला सांगितलं, “तुला फटकेबाजी करावी लागेल. कारण एकेरी धाव तर तू घेऊ शकतोस हे मला पण महिती आहे.” धोनीने असं सांगितल्यावर मग पियुष चावलाकडे काही पर्यायच उरला नव्हता. त्यानंतर उरलेल्या सरावात पियुष चावलाने फटकेबाजी करत फलंदाजी केली.