तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला. भारताने दिलेलं आव्हान जो रुट आणि इयॉन मॉर्गन जोडीने सहज पूर्ण केलं. दुसऱ्या सामन्याप्रमाणे अखेरच्या सामन्यातही भारतीय फलंदाजांनी निराशा केली. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. दुसऱ्या सामन्यात संथ खेळामुळे टीकेचा धनी बनलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यातच तिसरा सामना जिंकल्यानंतर धोनीने एका कृतीमधून आपण वन-डे क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

जो रुट आणि इयॉन मॉर्गन जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ८ गडी राखून सामना सहज जिंकला. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना धोनीने पंचाकडून चेंडू मागून घेतला. वास्तविकपणे धोनी सामना जिंकल्यानंतर आठवण म्हणून स्टम्प आपल्यासोबत घेतो. मात्र कालच्या सामन्यातील धोनीच्या या कृतीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दुसऱ्या सामन्यात ५९ चेंडूत ३७ धावा केलेल्या धोनीने तिसऱ्या सामन्यातही केवळ ४२ धावांची खेळी केली. मात्र या खेळीसाठीही धोनीने ६६ चेंडू घेतले. सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीची बॅट गेले काही दिवस मैदानात शांत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.