प्रशांत केणी

‘‘भारतीय क्रिकेटच्या कार्यक्रम पत्रिकेचा नकारात्मक परिणाम रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेवर होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तुलनेत रणजी क्रिकेटला दुय्यम स्थान दिले जात आहे. ‘आयपीएल’च्या कालखंडात भारत ‘अ’ किंवा १९ वर्षांखालील संघांचे सामने का नसतात,’’ असा सवाल काही दिवसांपूर्वी भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी केला होता. रणजीमधील सामन्याच्या मानधनाचा विचार करता गरीब चुलत भावाप्रमाणेच त्याला वागणूक दिली जात आहे, असे भाष्यसुद्धा त्यांनी केले होते. रणजी क्रिकेटमधील मुंबईच्या अपयशाची कारणेसुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेतच दडली आहेत.

४१ वेळा रणजी विजेतेपद हा मुंबईचा रुबाब. परंतु यंदा सलग दुसऱ्यांदा मुंबईचा संघ साखळीतच गारद झाला, तर २०१५-१६नंतर विजेतेपद दुर्मीळ झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय, भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील स्पर्धाची आखणी करताना रणजी क्रिकेटची हेळसांड केली आहे. याचाच फटका मुंबईला बसला आहे. वयोगटांच्या स्पर्धामुळे मुंबई क्रिकेट संघटनेला स्थानिक क्लब क्रिकेटचा दर्जा राखता आलेला नाही. त्यामुळेच योग्य गुणवत्ता असतानाही मुंबईचे क्रिकेट समस्यांच्या चक्रव्यूहात अडकले आहे.या अपयशातही सकारात्मकता म्हणजे मुंबईचे अनेक खेळाडू विविध स्तरांवर चमकत आहेत. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सूर्यकुमार यादवसह आणखी अन्य खेळाडू भारत ‘अ’ संघाकडून खेळले, तर यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर भारतीय युवा संघाकडून खेळत आहेत.

दिलीप वेंगसरकर

भारताचे माजी कर्णधार

‘अ’ संघाचे अवडंबर कशाला?

मुंबई संघाला पूर्ण ताकदीनिशी यंदाच्या रणजी हंगामात खेळताच आले नाही. अन्यथा विजेतेपद जिंकण्याची क्षमता आणि गुणवत्ता मुंबईत नक्की आहे. सध्या भारत ‘अ’ संघाचे खूप अवडंबर माजले आहे. देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रम करताना रणजी स्पर्धेला योग्य स्थान दिले न गेल्याने त्याचे महत्त्व कमी झाले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड आणि ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या धोरणाचा गांभीर्याने विचार करावा. मुंबईच्या महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी भारत ‘अ’ संघाच्या सामन्यांमुळे अनेक खेळाडूंची उणीव भासली. दुसरी फळी घडण्यास मदत झाली, हा यातील सकारात्मक भागसुद्धा आहे. आता मुंबईतील क्लब क्रिकेटचा दर्जा कमालीचा ढासळला आहे. एकेकाळी क्लबसाठी कसोटी क्रिकेटपटू खेळायचे. आताच्या क्रिकेटपटूंना व्यग्र कार्यक्रमात वेळच नाही.

प्रवीण अमरे

माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक

अपयश सर्वाचेच, पण..!

मुंबईचा संघ अपयशी ठरला, म्हणून कुणावर तरी खापर फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. सलग दोन वर्षे बाद फेरी न गाठणे, हे चिंताजनक आहे. यंदाचा संघ समतोल होता. संघ जिंकतो, तेव्हा सांघिकता असते. पदाधिकाऱ्यांचेही योगदान असते. पण यंदा निवड समितीवरही पदाधिकाऱ्यांचा अंकुश होता, असे ऐकिवात आहे. त्यामुळे हे अपयश फक्त खेळाडूंचेच नसून सर्वाचेच आहे. गेली दोन वर्षे मुंबईचा सलामीच्या जोडीचा शोध सुरू होता. आकर्षित गोमेलने या स्थानावर हंगामाअखेरीस दावा केला आहे. सर्फराज खानने सातत्याने धावा काढल्या आहेत. शाम्स मुलानीसारखा अष्टपैलू खेळाडू गवसला. रॉयस्टन डायस, अंकुश जैस्वाल सकारात्मक खेळत आहेत. हे अपयशातील सकारात्मक मुद्दे आहेत. आणखी महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या प्रशिक्षकासाठी योग्य मानधनाची संघटनेने तरतूद करावी. या हंगामातील सकारात्मक बाब म्हणजे बरेच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतायत.

सुलक्षण कुलकर्णी

मुंबईचे माजी प्रशिक्षक

स्थानिक क्रिकेटचा दर्जा घसरला!

दोन हंगाम बाद फेरी गाठू शकलो, तर गेली चार हंगाम जेतेपद मिळवू शकलो नाही. अंतिम फेरीत हरणे हेसुद्धा मुंबईसारख्या संघासाठी मी अपयशच मानतो. या इतक्या वर्षांचे विश्लेषण केल्यास ‘बीसीसीआय’ची भारत ‘अ’ संघाची कार्यक्रम पत्रिका ही अडचणीची ठरत आहे. देशांतर्गत क्रिकेटसाठी त्रासदायक होईल, अशी कोणतीही कृती अन्य देशांमध्ये केली जात नाही. कौंटी क्रिकेट, शेफिल्ड क्रिकेटने आपला दर्जा टिकवला आहे. इथे भारत, भारत ‘अ’ आणि भारत युवा या तिन्ही संघांसाठी मुंबईचे खेळाडू खेळत आहेत. एके काळी युवा क्रिकेटपेक्षा रणजीला अधिक मान दिला जायचा. मुंबईची दुसरी फळी तयारच झाली नाही. मुंबईतील स्थानिक क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. टाइम्स शिल्ड ‘अ’ विभागीय क्रिकेटचा स्तर आता खालावला आहे. आता क्लब क्रिकेटपेक्षा वयोगटांच्या क्रिकेटला महत्त्व आले आहे. फलंदाजी हे मुंबईचे वैशिष्टय़ आता राहिलेले नाही.

prashant.keni@expressindia.com