ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लॉयनने कसोटी क्रिकेटमध्ये एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत लॉयनने २० हजार चेंडू टाकले असून यामध्ये एकही चेंडू त्याने नो-बॉल म्हणून टाकलेला नाहीये. सर्वसाधारणपणे क्रिकेटमध्ये फिरकीपटूंना कमी रनअप असल्यामुळे नो-बॉल टाकण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र अनेकदा आपण रविंद्र जाडेजा सारख्या फिरकीपटूंना नो बॉल टाकताना पाहिलं आहे, अशावेळी लॉयनने केलेली ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे.

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतही लॉयनने आपल्या बाजूने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेदरम्यान लॉयनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आपले सहकारी ब्रेट ली आणि मिचेल जॉन्सन यांना मागे टाकलं आहे. अबुधाबी कसोटीत ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानकडून ३७३ धावांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र या सामन्यातही लॉयनने गोलंदाजीत आपली कमाल दाखवली. या विजयासह पाकिस्तानने २ कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली आहे.

अवश्य वाचा – कांगारुंवर मात करत पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीत बाजी; मालिकाही टाकली खिशात