सायना नेहवाल हिला निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले असले तरी पी.व्ही.सिंधू हिच्यासह भारताच्या अन्य उदयोन्मुख खेळाडूंनी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली आहे, असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी येथे सांगितले.
या स्पर्धेत आपल्या देशाचे अनेक खेळाडू पात्रता फेरीपासून मुख्य फेरीत चमक दाखवू शकले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना हिला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे मला थोडेसे दु:ख झाले. तरीही भारताची एकूण कामगिरी मला आनंद देणारी आहे. सिंधू व आनंद पवार यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली. हे यश मिळविताना त्यांनी अनेक अनुभवी खेळाडूंना हरविले आहे. एच.ए.प्रणय यानेही चमकदार कामगिरी केली आहे. कनिष्ठ खेळाडूंमधून अनेक खेळाडू वरिष्ठ स्तरावरील स्पर्धामध्ये चांगले नैपुण्य दाखवू लागले आहेत, असे गोपीचंद यांनी सांगितले.
सिंधूच्या कामगिरीविषयी गोपीचंद म्हणाले,‘‘सिंधू ही जेमतेम १७ वर्षांची खेळाडू आहे. उपांत्य फेरीत तिला जागतिक क्रमवारीतील राचनोक इन्तानोन हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना तिने गमावला असला तरी सिंधू हिला उज्ज्वल भवितव्य आहे. तिने दाखविलेले कौशल्य, जिद्द कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धामधील सामन्यांचा अनुभव तिला आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रणय याने माजी जगज्जेता खेळाडू तौफिक हिदायत याच्यावर मिळविलेला विजय खरोखरीच सनसनाटी आहे. प्रणय याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची क्षमता आहे.’’