भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार रोहित शर्मा या साऱ्यांचे जगभरात आणि विशेषत: भारतात लाखो चाहते आहेत. तुमचा सध्याचा आवडता क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना विचारला की त्यांचं उत्तर हे विराट कोहली, रोहित शर्मा किंवा धोनी यांपैकी एक असण्याची दाट शक्यता असते. पण बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मात्र या प्रश्नाचं वेगळंच उत्तर दिलं आहे.

IPL 2020 आता लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे. या लोकप्रिय स्पर्धेत नेहमीच बॉलिवूड स्टार्सची हजेरी असते. यंदा या सामन्यांसाठी प्रेक्षकांची हजेरी नसणार आहे. त्यामुळे विविध सिनेस्टार्सना त्यांच्या क्रिकेटबद्दलच्या आवडीनिवडी सांगण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो आहे. नुकतेच अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी फिल्म कंपेनियन नावाच्या वेबसाइटला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतील त्यांना क्रिकेटशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले.

नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आलं की सध्याचा तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे? त्यावर नसीरुद्दीन शाह यांनी धोनी, विराट किंवा रोहितचं नाव न घेता थेट अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचं नाव घेतलं. याशिवाय त्यांना आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? असाही सवाल करण्यात आला. त्यावर, सर्वोत्तम कर्णधार मन्सूर अली खान पतौडी असल्याचे ते म्हणाले.