10 April 2020

News Flash

पाकिस्तानला सुरक्षेची लेखी हमी हवी

सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत पाकिस्तानी संघ लाहोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तळ ठोकून आहे

| March 11, 2016 05:30 am

भारतात क्रिकेट संघाला पाठवण्याबाबत पाक सरकारची ठाम भूमिका

भारतात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानच्या सहभागाविषयीचे गूढ अद्याप टिकून आहे. सुरक्षेसंदर्भात भारताकडून लेखी हमी येईपर्यंत क्रिकेट संघाला रवाना होण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका पाकिस्तान सरकारने घेतली आहे.

‘‘सध्या तरी पाकिस्तानच्या संघाला आम्ही विश्वचषकाची परवानगी दिलेली नाही. कारण हा धोका पाकिस्तानकेंद्रित आहे. जेव्हा आमचे खेळाडू खेळत असतील, तेव्हा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नसेल, अशी आमची धारणा आहे. भारत सरकारकडून जोपर्यंत आम्हाला लेखी हमी मिळणार नाही, तोपर्यंत भारतात जाण्याची आम्ही संघाला परवानगी देणार नाही,’’ असा इशारा पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी दिला आहे.

‘‘धोकादायक परिस्थितीत क्रिकेट कसे खेळता येईल? ईडन गार्डन्सची क्षमता जवळपास एक लाखाची आहे. कुठूनही दगडफेक झाली तर काय करायचे? यासाठीच आम्हाला सुरक्षेची हमी हवी आहे,’’ असे खान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना धरमशालाहून कोलकाता येथे हलवण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व महत्त्वाच्या स्पर्धासाठी सुरक्षा व्यवस्था केली जाते. गेल्या महिन्यात आसाममध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले.

‘‘भारतात आतापर्यंत झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे, ही वस्तुस्थिती आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत पाकिस्तानचाही समावेश होता. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाही अशाच पद्धतीने यशस्वी होईल, अशी मला आशा आहे,’’ असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्ली येथे सांगितले.

आता संघ पाठवण्याची जबाबदारी ही पाकिस्तानची असेल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे. ‘‘आम्ही सर्वोत्तम दर्जाची सुरक्षा व्यवस्था भारतात केली आहे. जर या परिस्थितीतही ते स्पध्रेत सहभागी होऊ शकत नसतील, तर आमच्याकडे कायदेशीर मार्ग मोकळा आहे.

त्यामुळे पाकिस्तानचे न येणे, हे अन्यायकारक ठरेल,’’ असे आयसीसीने म्हटले आहे.

सरकारकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत पाकिस्तानी संघ लाहोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तळ ठोकून आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रसारमाध्यम संचालक अमजदहुसैन यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी सकाळी पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी संघातील खेळाडूंची भेट घेतली.ह्ण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 5:30 am

Web Title: pakistan cannot match security guarantee in writing
टॅग Pakistan
Next Stories
1 महासंग्राम!
2 साई प्रणीतचा धक्कादायक विजय
3 शेष भारताचा ऐतिहासिक विजय
Just Now!
X