ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका

आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फिरकीपटू यासिर शाहने (११३) रविवारी कारकीर्दीतील पहिलेवहिले झुंजार शतक झळकावले. परंतु त्याच्या शतकाला बाबर आझम वगळता अन्य फलंदाजांची पुरेशी साथ न लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रकाशझोतातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पाकिस्तानपुढे पराभवाचे सावट आहे.

फॉलो-ऑनची नामुष्की स्वीकारणाऱ्या पाकिस्तानची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ३९ धावा अशी बिकट अवस्था झाली असून ते अद्यापही २४८ धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे चौथ्या दिवशीच उर्वरित सात बळी मिळवून मालिकेत २-० असे यश संपादन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे.

शनिवारच्या ६ बाद ९६ धावांवरून पुढे खेळताना पाकिस्तानच्या बाबर आणि यासिर यांनी नेटाने फलंदाजी करत सातव्या गडय़ासाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. परंतु सलग दुसरे शतक झळकावण्यासाठी उत्सुक असलेला बाबर ९७ धावांवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. यासिरने १०व्या क्रमांकावरील मोहम्मद अब्बासच्या (२९) साथीने पाकिस्तानला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला.

जोश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत यासिरने शतकाला गवसणी घातली. परंतु शतकानंतर लगेचच बाद झाल्याने पाकिस्तानचा पहिला डाव ३०२ धावांवर संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा बळी मिळवले.

२८७ धावांची आघाडी मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर फॉलो-ऑन लादला. परंतु दुसऱ्या डावातही पाकिस्तानची भंबेरी उडाली असून भरवशाचा बाबरही (८) माघारी परतला आहे. त्यामुळे शान मसूद (१४*) आणि असद शफिक (८*) या दोघांवरच पाकिस्तानच्या आशा कायम आहेत.

संक्षिप्त धावफलक

* ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३ बाद ५८९ (डाव घोषित)

* पाकिस्तान (पहिला डाव) : ९४.४ षटकांत सर्व बाद ३०२ (यासिर शाह ११३, बाबर आझम ९७; मिचेल स्टार्क ६/६६)

* पाकिस्तान (दुसरा डाव) : १६.५ षटकांत ३ बाद ३९ (शान मसूद १४*, असद शफिक ८*; जोश हॅझलवूड २/१५).