परदेशातील खेळपट्टय़ांवर चेंडू अनपेक्षितरीत्या उसळून येत असतो. त्यामुळे अशा खेळपट्टीवर यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याऐवजी ते सोडून देण्यास प्राधान्य देण्याची गरज असते, असे भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने सांगितले.

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला केप टाऊन येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. भारताला येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेत ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वेळी पुजाराने भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली होती. पुजाराने यापूर्वी दोन वेळा आफ्रिकेचा दौरा केला आहे.  पुजारा म्हणाला, ‘‘द.आफ्रिकेतील कसोटी मालिकेत तंत्रशुद्ध खेळाबरोबरच सकारात्मक मानसिक तंदुरुस्ती ठेवावी लागते. दोन वेळा  दौरा केला असल्यामुळे हवामान व खेळपट्टय़ांचा मला भरपूर अभ्यास झाला आहे. अनुभव पाठिशी असला की खेळपट्टी कशीही असली तरी कामगिरी सर्वोत्तमच होत असते.’’