नवी दिल्ली येथे पाहुण्या न्यूझीलंड संघाविरुद्ध १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या सराव सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय मुंबईच्या संघात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे.

यष्टीरक्षक आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात कसोटीपटू अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आलेला नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले.

अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि धवल कुलकर्णी हे चौघेसुद्धा मुंबईच्या संघात नाहीत. कारण ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ भारतात तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. हे सामने २२ सप्टेंबरपासून २९ ऑक्टोबपर्यंत चालणार आहेत.

मुंबईचा संघ : आदित्य तरे (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, कौस्तुभ पवार, जय बिस्ता, सुफियान शेख, अरमान जाफर, परीक्षित वळसांगकर, विशाल दाभोळकर, विजय गोहिल, बलविंदर सिंग संधू (ज्युनिअर), तुषार देशपांडे, रॉयस्टॅन डायस, हर्षल सोनी.