महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. विराटच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करतो. त्यामुळे काहीच दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याने रोहितला दुसरा धोनी ही पदवी बहाल केली होती. त्यावर आता रोहितने उत्तर दिले आहे.

काय म्हणाला होता रैना?

“रोहित शर्मा भारतीय संघाचा दुसरा महेंद्रसिंह धोनी आहे. मी त्याला मैदानावर पाहिलं आहे. तो शांत असतो, प्रत्येक वेळी तो आपल्या सहकाऱ्यांची मतं विचारात घेतो. नवीन खेळाडूंना आत्मविश्वास देण्यापासून खडतर काळात संघाचं नेतृत्व करणं हे सर्व गुण त्याच्यात आहेत. ज्यावेळी कर्णधार मैदानात अशी चांगली कामगिरी करत असतो तेव्हा साहजिकच संघावर आणि ड्रेसिंग रुममधील वातावरणावर त्याचा चांगला परिणाम होतो”, असे मत रैनाने दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी याच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केलं होतं.

रोहित शर्माने दिली प्रतिक्रिया

“रैनाने माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य मी ऐकलं. धोनी हा एक वेगळाच माणूस आणि क्रिकेटपटू आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी होणं शक्यच नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाची काही ना काही बलस्थानं आणि उणीवा असतात. त्यामुळे अशाप्रकारे दोन खेळाडूंमध्ये तुलना करण्यात येऊ नयेत असं मला वाटतं”, असे मत रोहितने ट्विटरवर व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केले.