विंडीजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेसाठी बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती दिली होती, तर महेंद्रसिंह धोनीला संघातून वगळलं होतं. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. मात्र पहिल्या सामन्यात रोहितने दिनेश आणि ऋषभ या दोन्ही यष्टीरक्षकांना संघात जागा देऊन, दिनेश कार्तिककडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. मात्र भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दिनेश कार्तिकऐवजी ऋषभ पंतला आपला पाठींबा दर्शवला आहे. रोहितने दिनेशऐवजी पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवावी असं मत अझरुद्दीने व्यक्त केलं आहे.

“सध्या ऋषभ पंतवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. जर तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत यष्टीरक्षण करु शकत असेल तर टी-२० मालिकेत का नाही? त्याने इंग्लंडमध्ये दिनेश कार्तिकच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. माझ्या मते ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवायला हवी. जर यष्टीरक्षक म्हणून तुमची संघात निवड झाली असेल तर तुम्ही तेच काम करणं गरजेचं आहे. ऋषभ चांगला खेळाडू आहे, जेवढी संधी त्याला मिळेल तेवढा तो शिकत जाईल. मात्र पंतला आपल्या यष्टीरक्षणात अजुन सुधारणा करणं गरजेचं आहे.” पहिल्या सामन्यादरम्यान अझरुद्दीन पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा –  Ind vs WI : पहिल्या टी-२० सामन्यात झालेले हे ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

याचसोबत अझरुद्दीने फिरकीपटू कुलदीप यादवचंही कौतुक केलं. “कुलदीपने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या कामगिरीत चांगली सुधारणा केली आहे. आगामी काळात तो टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असेल.” याआधी भारताने २ कसोटी सामन्यांची मालिका २-० ने तर ५ वन-डे सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली आहे. टी-२० मालिकेतला पहिला सामना जिंकत भारताने सुरुवात तर चांगली केली आहे, त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.