सचिन तेंडुलकरने आपल्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. आजही अनेक विक्रम सचिनच्या नावावर जमा आहेत. मैदानावर उतरल्यानंतर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करणारा सचिन आजही अनेक भारतीय चाहत्यांना आठवत असेल. परंतू इतक्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतरही सचिनला एक गोष्ट कधीच जमली नाही. भारतीय संघाचे विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी ही गोष्ट सांगितली आहे.

अवश्य वाचा – म्हणून सचिनला मी खांद्यावर उचललं; विराटनं उलगडलं रहस्य

“सचिनकडे प्रचंड गुणवत्ता होती आणि आहे…मी आतापर्यंत कोणत्याही खेळाडूकडे एवढी गुणवत्ता पाहिलेली नाही. शतकी खेळी कशी करायची हे त्याला माहिती होतं, पण तो कधीही आक्रमक फलंदाज होऊ शकला नाही. सचिनने क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वकाही साध्य केलं. त्याला शतकं झळकावणं माहिती होतं. मात्र त्या शतकाचं द्विशतकात आणि द्विशतकाचं त्रिशतकात रुपांतर करणं सचिनला जमलं नाही. सचिनने खरंतर ३ त्रिशतकं आणि १० द्विशतकं झळकावायला हवी होती. जलदगती गोलंदाज असो किंवा फिरकीपटू प्रत्येक षटकात चौकार लगावण्याची ताकद सचिनमध्ये होती.” कपिल देव भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही.रमण यांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा द्विशतक झळकावण्याचा मान हा सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्येही सचिनने द्विशतक झळकावलं आहे. परंतू कसोटी कारकिर्दीत सचिनला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. बांगलादेशविरुद्ध २४८ धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. २०० कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नावावर १५ हजार ९२१ धावा जमा आहेत.