भारतीय हॉकी संघाचा अनुभवी खेळाडू सरदार सिंहने नुकतीच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. गेली अनेक वर्ष भारतीय हॉकीची जबाबदारी पेलल्यानंतर सरदार सिंहने अचानक निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्याने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला हॉकी विश्वचषक, आणि २०२० सालात टोकीयोमध्ये होणारं ऑलिम्पीक या स्पर्धांमध्ये सरदार खेळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली होती. मात्र आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर सरदारवर निवृत्तीसाठीचा दबाव वाढत होता. दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना, सरदारने आपल्या क्रीडा क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

२०१८ साली ऑस्ट्रेलियातील ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सरदारला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. या काळात मला प्रचंड मानसिक त्रास झाला, अशावेळी मी सचिन तेंडुलकरांना फोन केला, त्यांनी मला खूप चांगला आधार दिल्याचं सरदार म्हणाला. तुम्ही शून्यावर बाद झाल्यानंतर काय करायचात? असं विचारल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी मला हार न मानण्याचा सल्ला दिला. जी गोष्ट घडून गेली आहे ती आपल्याला बदलता येणं शक्य नसतं, म्हणूनच पुढच्या स्पर्धांसाठी तयारी करं असं सचिन सर मला म्हणाले. होणाऱ्या टीकेकडे लक्ष न देता, तुझा नेहमीचा खेळ खेळत रहा…सचिन सरांच्या या सल्ल्याचा मला पुढच्या काही महिन्यांमध्ये चांगलाच फायदा झाल्याचं सरदार म्हणाला.

सरदारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नेदरलँड येथील ब्रेडा शहरात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं उप-विजेतेपद मिळवलं. अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पेनल्टी शूटआऊटवर ३-१ ने हार पत्करावी लागली होती. “निवृत्तीचा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र प्रशिक्षक, सहकारी, परिवारातील सदस्यांशी चर्चा करुन मी हा निर्णय घेऊन टाकला. आता संघात माझ्याऐवजी तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं आहे. पुढचे काही दिवस घरातील सदस्यांसोबत घालवायचे आहेत.” सरदारने निवृत्तीच्या निर्णयावर आपली प्रतिक्रीया दिली.