श्रेयस अय्यरचे शैलीदार शतक व त्याने सूर्यकुमार यादवच्या साथीने केलेली शतकी भागीदारी यामुळेच मुंबईने सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट स्पध्रेतील अंतिम सामन्यात पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र त्यांचा डाव ८ बाद २६२ धावांवर मर्यादित ठेवून सौराष्ट्रने सामन्यातील रंगत कायम ठेवली आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळवली आहे. अय्यरने शतक झळकावत यादवच्या साथीने १५२ धावांची भागीदारी रचली. हेच मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याआधी धवल कुलकर्णीच्या पाच बळींमुळे सौराष्ट्रचा पहिला डाव २३५ धावांत गुंडाळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजेतेपद मिळेल.
सकाळच्या सत्रातील पहिला तास जयदेव उनाडकटनेच गाजवला. त्याने केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळेच सौराष्ट्रला सव्वादोनशे धावांपलीकडे पोहोचता आले. त्याने शार्दूल ठाकूरच्या एकाच षटकात दोन षटकार व एक चौकार अशी आतषबाजी केली. प्रेरक मंकडच्या साथीने त्याने नवव्या विकेटसाठी ४२ धावांची भर घातली. ही जोडी डोईजड होत असतानाच धवलने मंकडला बाद केले. मंकडने १४२ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ६६ धावा केल्या. पाठोपाठ ठाकूरने उनाडकटला (३१) बाद करीत सौराष्ट्रचा डाव संपुष्टात आणला.
धवल कुलकर्णीने केवळ ४२ धावा देत पाच बळी घेतले व संघाच्या विजयाचा पाया रचला. एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची त्याची ही तेरावी वेळ आहे.
उनाडकटने याच सत्रात अखिल हेरवाडकरला शून्यावरच बाद करीत मुंबईला पहिला हादरा दिला. त्या वेळी मुंबईची एकही धाव झाली नव्हती. पाठोपाठ त्याने भाविन ठक्करचा त्रिफळा उडवला. मात्र त्यानंतर अय्यर व यादव यांनी या खेळपट्टीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, याचाच प्रत्यय घडवला. अय्यरला चिराग जानीच्या गोलंदाजीवर अर्पित वासावडाने दिलेले जीवदान खूपच महागात पडले. त्या वेळी अय्यरच्या केवळ ३७ धावा झाल्या होत्या. हे जीवदान वगळता अय्यरने निदरेष खेळ करीत सौराष्ट्रच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. यादवने एका बाजूने संयमाने खेळ करीत त्याला साथ दिली. अय्यरने जानीच्या षटकात चोरटी धाव घेत शतक पूर्ण केले. त्याचे या मोसमातील चौथे शतक आहे. श्रेयस व यादव यांनी ३५.४ षटकांत १५२ धावांची भागीदारी करीत सौराष्ट्रच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली. जानीच्या गोलंदाजीवर जयदेव शहाने अय्यरचा झेल घेत ही जोडी फोडली. श्रेयसने १४२ चेंडूंत ११७ धावांचे योगदान दिले. त्यामध्ये १३ चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. त्याच्या पाठोपाठ कर्णधार आदित्य तरे हा १९ धावांवर तंबूत परतला. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना यादवने आपली विकेट गमावली. त्याने ११२ चेंडूंमध्ये झाल्यानंतर मुंबईवर दडपण आले. तथापि, सिद्धेश लाड व अभिषेक नायर यांनी ३० धावांची भर घालून घसरगुंडी थोपवली. मात्र संघास आघाडी मिळविण्यापूर्वीच तरे १९ धावांवर पायचीत झाला. मुंबईने सौराष्ट्रची धावसंख्या ओलांडली, मात्र त्यांनी धवल कुलकर्णी (१) व शार्दूल ठाकूर (०) हे आणखी दोन फलंदाज गमावले. सिद्धेश लाड (नाबाद २२) व इक्बाल अब्दुल्ला (नाबाद ८) यांनी आणखी पडझड थांबविली.

धावफलक
सौराष्ट्र (पहिला डाव) : ९३.२ षटकांत सर्व बाद २३५ (अर्पित वासावडा ७७, प्रेरक मंकड ६६; धवल कुलकर्णी ५/४२, शार्दुल ठाकूर ३/८९)
मुंबई (पहिला डाव) : ६६ षटकांत ८ बाद २६२ (श्रेयस अय्यर ११७, सूर्यकुमार यादव ४८; हार्दिक राठोड ३/४४, जयदेव उनाडकट २/५५)

श्रेयसची विक्रमी कामगिरी
श्रेयस अय्यरने एकाच रणजी मोसमात मुंबईकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळविला. वासिम जाफरने २००८-०९ मध्ये मुंबईकडून खेळताना १,२६० धावा केल्या होत्या. हा विक्रम श्रेयसने मागे टाकला. व्हीव्हीएस लक्ष्मणने १९९९-२००० मध्ये १४१५ धावा केल्या होत्या.

सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरणे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीनेच मी खेळत राहिलो. सूर्यकुमारने दिलेली साथही मोलाची ठरली. त्यामुळेच मी संघाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार करू शकलो. खेळत राहिले की शतकाचा उंबरठाही पार होऊ शकतो याची मला खात्री होती. अर्थात अंतिम सामन्यात मी हे शतक केले आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या खेळपट्टीबाबत चिंता करण्याचे कारण नाही. जर तुम्ही टिच्चून फलंदाजी केली तर आपोआप तुम्हाला धावा मिळतात.
– श्रेयस अय्यर, मुंबईचा फलंदाज