पहिल्या सामन्यात आमच्या गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात अपयश आले. त्यामुळे दुसऱ्या लढतीत खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच गोलंदाजांची निवड केली जाईल, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली.

दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने संघ निवडीविषयी मत मांडतानाच पहिल्या लढतीतील फलंदाजांच्या अपयाशाचा बचाव केला. ‘‘आमची फलंदाजी चांगल्या लयीत आहे. दिल्लीतील सामन्यात परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण गेले. त्यामुळे फलंदाजीत मी फारसे प्रयोग करू इच्छित नाही. परंतु गोलंदाजांची निवड मला प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी खेळपट्टी पाहून करावी लागणार आहे,’’ असे रोहित म्हणाला.

कारकीर्दीतील १००व्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याच्या विक्रमाविषयी विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘२००७ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापासून सुरू झालेला हा प्रवास अविस्मरणीय असा आहे. माझ्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक चढ-उतार आले. परंतु जवळच्या व्यक्तींनी मला कायम दिलेला पाठिंबा आणि स्वत:वरील विश्वासामुळे मी इथवर मजल मारू शकलो.’’

रोहित शतकी मनसबदार

* गुरुवारी राजकोटच्या खेळपट्टीवर उतरताच रोहितच्या नावावर आणखी एका शतकाची नोंद होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० ट्वेन्टी-२० सामने खेळणारा रोहित हा भारताचा पहिला आणि विश्वातील दुसरा फलंदाज ठरणार आहे. शोएब मलिकने १११ सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले असल्याने तो रोहितपेक्षा पुढे आहे.

* ३२ वर्षीय रोहित सध्या ट्वेन्टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत २,४५२ धावांसह अग्रस्थानी असून विराट कोहली २,४५० धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने ९९ ट्वेन्टी-२० सामन्यांत १३६.६७ च्या सरासरीने चार शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत.