सचिन तेंडुलकर खरे तर आमच्या पिढीचे आदर्श, त्यांना पाहून आमच्या पिढीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर काही क्षण घालवण्याची संधी मला मिळाली आणि हे क्षण माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले, असे मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवणाऱ्या सिद्धेश लाडने सांगितले.
वेस्ट इंडिजचा संघ गेल्या वेळी भारतीय दौऱ्यावर आला असताना वानखेडेवर एक सामना झाला होता, त्या वेळी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून सिद्धेशची वर्णी लागली होती. त्या वेळी सचिनबरोबर ‘ड्रेसिंग रूम’मध्ये त्याला सचिनचा सहवास लाभला आणि एक स्वप्न पूर्ण झाल्याचे सिद्धेशने सांगितले.
‘‘सचिन असलेल्या संघात स्थान मिळवण्याचे माझे स्वप्न होते, ते काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. २०११मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्या वेळी वानखेडेवर झालेल्या सामन्यासाठी माझी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. त्या वेळी सचिनबरोबर मी एकाच ‘ड्रेसिंग रूम’मध्ये होतो आणि माझे स्वप्न पूर्ण झाले. एक जगविख्यात क्रिकेटपटू असूनही तो युवा खेळाडूंना समजून घेतो आणि समजावून सांगतो. एवढा महान क्रिकेटपटू असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत, हे त्याच्याकडून आम्हाला शिकण्यासारखे आहे. या वेळी बऱ्याच गोष्टी त्याच्याकडून समजल्या, ज्याचा फायदा नक्कीच आम्हाला पुढच्या प्रवासात होईल,’’ असे सिद्धेशने सांगितले.
सचिनने मुंबईच्या संघासोबत वानखेडेवर चार दिवस सराव केला. याबद्दल सिद्धेश म्हणाला की, ‘‘सचिन ज्या पद्धतीने सराव करतो, ते पाहण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे. नेट्समध्ये त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी जवळून पाहायला मिळाली, त्याने काही मोठे फटके मारले. त्याला फलंदाजी करताना पाहणे हादेखील एक प्रशिक्षणाचा भाग आहे.’’
मुंबई रणजी स्पर्धेत प्रथमच निवड झाल्याबद्दल सिद्धेश म्हणाला की, ‘‘मुंबई रणजी संघात जागा मिळवणे हे एक स्वप्न होते, ते अखेर पूर्ण झाले. पण निवड झाल्यावर मी गाफील राहणार नाही, कारण या स्थानाची जाणीव मला आहे. यामागे मेहनत आणि संघर्षही आहे. यापुढे सातत्यपूर्ण दमदार फलंदाजीच्या जोरावर संघाला विजयी करू शकलो, तर मी स्वत:ला भाग्यवान
समजेन.’’