पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी कडव्या झुंजीनंतर आपापले सामने जिंकून मकाऊ ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बी. साईप्रणीतला मात्र तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
सिंधूने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेट्रीचे आव्हान एक तासाच्या कडव्या प्रतिकारानंतर परतवून लावले. सिंधूने हा सामना २१-१६, १६-२१, २१-१९ असा जिंकला. पहिल्या गेममध्ये दुसरी मानांकित सिंधू मागे पडली होती. मात्र त्यानंतर तिने ११-१० अशी आघाडी घेतली. सुरेख खेळाचे प्रदर्शन करून सिंधूने ही आघाडी १६-११ अशी वाढवली. मात्र १७-१६ अशा स्थितीतून पुढील चारही गुण मिळवत सिंधूने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र फॅनेट्रीने ७-१ अशी आघाडी घेतली. सिंधूने तिला गाठण्याचा प्रयत्न केला. पण फॅनेट्रीने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येही सिंधू ६-१६ अशी पिछाडीवर पडली होती.पण त्यानंतर तिने  १७-१७ अशी बरोबरी साधली. सिंधूने अनुभव पणाला लावत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
पुरुष एकेरीत तिसऱ्या मानांकित प्रणॉयने तैवानच्या लिन यू-सिएनचा १७-२१, २१-१९, २१-१४ असा पाडाव केला. कुंकोरोने भारताच्या आठव्या मानांकित साईप्रणीथला २१-१६, १९-२१, २१-१७ असे पराभूत केले.