दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज जे पी ड्युमिनी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ड्युमिनी एकदिवसीय World Cup 2019 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र तो आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये यापुढेही खेळत राहणार आहे.

विंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यांनी आगामी World Cup 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. या यादीत आता जेपी ड्यूमिनीचे नाव सामील झाले आहे. World Cup 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.

ड्युमिनीने सप्टेंबर २०१७ मध्ये कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निर्धारित षटकांच्या (एकदिवसीय व टी २०) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने ही निवृत्ती घेतली होती. ”गेल्या काही महिन्यात मी संघाबाहेर आहे. मला आता पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. विश्रांतीच्या काळात मी माझ्या भविष्याचा विचार केला. माझ्यासाठी हा निर्णय घेणे खूप अवघड होते. यापुढे मी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक टी २० सामने खेळणार आहे. पण आता मी कुटुंबियांना वेळ देण्यास प्राधान्य देणार आहे”, असे ड्युमिनी म्हणाला.

काही दिवसांपूर्वी विंडिजचा झंझावाती फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (ODI) निवृत्ती जाहीर केले होते. विंडिजची इंग्लंड विरोधातील एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होण्याआधी त्याने ही घोषणा केली. वेस्ट इंडिज क्रिकेटनेही ट्विटरवरून ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याची माहिती दिली होती. ही घोषणा केली त्यावेळी ख्रिस गेलने २८४ एकदिवसीय सामन्यात ९ हजारांच्यावर धावा केल्या आहेत. २३ शतकं आणि ४९ अर्धशतकं गेलच्या नावावर जमा आहेत. २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरोधात ख्रिस गेलने २१५ धावा केल्या होत्या. विश्वचषकातली ही त्याची पहिली द्विशतकी खेळी होती.