प्रशांत केणी

काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई (सॅफ) क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणेच भारताने विक्रमी पदकभरारी घेतली. १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह एकूण ३१२ पदकांची कमाई करीत सलग १३व्या स्पर्धेत अग्रस्थानासह वर्चस्व गाजवले. ४८७ खेळाडूंच्या पथकाने मिळवलेले हे यश वरकरणी कौतुकास्पद वाटत असले तरी वस्तुस्थिती तशी मुळीच नाही. ही पदके आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी प्रेरणा देतील का? खेळाडूंना आणखी उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल का?.. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

कारण बलाढय़ अथवा तुल्यबळ खेळाडूंशी किंवा संघांशी सामना करूनच कामगिरी सुधारू शकते. नवख्या, अननुभवी किंवा लिंबूटिंबू संघांविरोधात हा उत्कर्ष साधला जाऊ शकत नाही. यंदाच्या ‘सॅफ’ स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रतिस्पर्धी देशांचे भारतापुढे आव्हान होते. म्हणजेच ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ हेच भारताचे ‘सॅफ’ स्पर्धेतील महत्त्वाचे स्थान असल्यामुळे हमखास पदकांच्या लयलुटीचा दक्षिण आशियाई क्रीडात्मक कार्यक्रम पुन्हा उत्साहात पार पडला; किंबहुना ‘सॅफ’ स्पर्धेपेक्षा भारतातील राज्य अजिंक्यपद स्पर्धा कित्येक पटीने स्पर्धात्मक असतात, असे म्हणता येईल.

जागतिक लोकसंख्येचा २१ टक्के भाग हा दक्षिण आशियाई म्हणजेच ‘सार्क’ देशांचा आहे. म्हणजेच एकपंचमांश लोकसंख्या असूनही, दक्षिण आशियाई देशांना क्रीडात्मक उंची हवी तशी गाठता आली नाही. आतापर्यंत आठ ‘सॅफ’ देशांनी (अफगाणिस्तानसह) एकूण ४२ ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यापैकी २८ भारताची आहेत, तर अन्य १४ पदके पाकिस्तान (१० पदके), बांगलादेश (२ पदके) आणि श्रीलंका (२ पदके) यांनी जिंकली आहेत. यातूनच भारताचे मोठेपण सिद्ध होते. बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ या देशांना अद्याप ऑलिम्पिक पदकांचे खातेसुद्धा उघडता आलेले नाही.

‘सॅफ’ स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्स (४८ पदके), जलतरण (५२ पदके), तलवारबाजी (११ पदके) आणि तायक्वांदो (२६ पदके) या क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची लयलूट केली; पण ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये या खेळात भारतीय खेळाडू कधीच चमकलेले नाहीत. १९०० मध्ये नॉर्मन प्रिचार्डने दोन रौप्यपदके जिंकली होती. मग स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात धावपटू मिल्खा सिंग आणि ऐंशीच्या दशकात पी. टी. उषा यांची हुकलेली पदके हेच अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे सुवर्णक्षण. बाकी बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी, कबड्डी या क्रीडा प्रकारांमध्ये आव्हान नसल्यामुळे यश सहज साध्य करता आले.

‘सॅफ’ स्पर्धामध्ये खेळाडूंची निवड करताना १६ ते १९ वर्षांच्या खेळाडूंना प्रामुख्याने पाठवल्यास ते ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धामध्ये युवा भारतीय खेळाडूंच्या विकासासाठी प्रेरक ठरेल. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १९ वर्षीय नेमबाज मेहुली घोषने ‘सॅफ’ स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक अजिंक्यपद, युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या व्यासपीठांवर रौप्यपदकांची कमाई करणाऱ्या मेहुलीकडून ‘सॅफ’चे यश अपेक्षितच होते; पण तिने अंतिम फेरीत मिळवलेले २५३.३ गुण हे कौतुकास्पद आहेत. या प्रकारातील २५२.९ गुणांचा विश्वविक्रम अपूर्वी चंडेलाच्या नावावर आहे. त्याहून मेहुलीने ०.४ गुण अधिक मिळवले; परंतु आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेची ‘सॅफ’ स्पर्धेला मान्यता नसल्याने हा विश्वविक्रम ग्राह्य़ धरण्यात येणार नाही. त्यामुळे मेहुलीचे यश हे ऑलिम्पिकच्या दृष्टीने आशादायी आहे.

दक्षिण आशियाई देशांच्या क्रीडात्मक विकासासाठी ‘सॅफ’ क्रीडा स्पर्धाना प्रारंभ झाला. भारतासाठी या स्पर्धेत फारशी स्पर्धात्मकता नसली तरी मालदीव, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यासारख्या देशांमध्ये त्याचे मोल अधिक आहे. ‘सॅफ’ स्पर्धाची कामगिरी भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये कधीच परावर्तित करता आली नाही, हे जरी वास्तव असले तरी तूर्तास भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करून सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टोक्यो ऑलिम्पिककडे आशेने पाहू!

स्पर्धा वर्ष  सुवर्ण      रौप्य   कांस्य    एकूण

‘सॅफ’ २०१०    ९०       ५५    ३०       १७५

ऑलिम्पिक २०१२ ०     २     ४          ६

राष्ट्रकुल२०१४   १५    ३०    १९           ६४

आशियाई२०१४  ११    १०    ३६          ५७

‘सॅफ’ २०१६    १८९   ९०     ३०        ३०९

ऑलिम्पिक २०१६ ०     १    १         २

राष्ट्रकुल२०१८   २६  २०    २०        ६६

आशियाई२०१८  १५  २४    ३०        ६९

‘सॅफ’ २०१९ १    ७४    ९३    ४५        ३१२

prashant.keni@expressindia.com