News Flash

आम्ही खेळकर!

जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातल्या कार्यशील कुटुंबांचा घेतलेला आढावा.

जागतिक कुटुंब दिन विशेष

कुटुंब म्हणजे आधारवड. असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या वाटचालीत कुटुंबाचे योगदान मोलाचे असते. घरातल्यांनी एखाद्या सदस्याच्या मागे ताकद उभी केल्याचे प्रसंगही अनेक आहेत. मात्र अख्खं कुटुंब एकाच क्षेत्रात घोडदौड करणे दुर्मीळ. मागच्या पिढीकडून मिळालेला गौरवशाली वारसा जपत या ठेव्याला आणखी वृद्धिंगत करण्याचे काम पुढच्या पिढीने केले आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातल्या कार्यशील कुटुंबांचा घेतलेला आढावा.

नेमबाजीतले ‘पंडित’

भिन्न प्रवृत्ती एकमेकांना आकर्षित करतात ही मानवी प्रवृत्ती. मात्र हेच तत्त्व समविचारी आणि एकाच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाटचाल करणाऱ्या व्यक्तींना लागू होईलच याची शाश्वती नाही. मात्र अशोक पंडित, त्यांचा मुलगा रौनक पंडित आणि सून हीना सिधू या एकाच घरातल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी वसा जपला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके, प्रतिष्ठेचा अर्जुन तसेच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि संघटक ही अशोक पंडितांची ओळख. वडिलांकडून मिळालेल्या बाळकडूंच्या जोरावर रौनकनेही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेत रौप्यपदकप्राप्त रौनकच्या नावावर राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील दीडशेपेक्षा अधिक पदके जमा आहेत. २००८ मध्ये रौनकची हीना सिधूशी ओळख झाली. एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळताना ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. हीनाचा वैयक्तिक प्रशिक्षक होतानाच दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला. दंतवैद्यकसारखा आव्हानात्मक अभ्यासक्रम पूर्ण करताना हीनाने नेमबाजीत पिस्तूल प्रकारात जागतिक स्तरावर घेतलेली झेप थक्क करणारी आहे. पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या हीनाने २०१३ मध्ये नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला. अन्नू राज सिंगच्या साथीने खेळताना हीनाने २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकावर कब्जा केला. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी हीना पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. वडिलांकडून मिळालेली नेमबाजाची परंपरा हीनाने लग्नानंतरही कायम राखली. वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवण्याची उदाहरणे समाजात आढळतात. मात्र एकाच खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारे वडील-मुलगा आणि सून हे त्रिकूट अपवादात्मक आहे. खेळाडू म्हणून वावरतानाच अशोक यांनी राज्य नेमबाजी संघटनेच्या कामकाजाची धुरा सांभाळली आहे. रौनक यांनी पूर्णवेळ नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करत नवीन नेमबाज घडवण्याची नवीन जबाबदारी हाती घेतली आहे. नेमबाजी आणि दंतवैद्यक ही आव्हाने सांभाळणाऱ्या हीनाला आता फाइन आर्ट्सचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. घरात नेमबाजीची चर्चा होताना तिघांचे अनुभव एकमेकांना उपयुक्त ठरतात. रिओ ऑलिम्पिकमध्ये हीना पदकाच्या शर्यतीत आहे. माहेरी आणि सासरी नेमबाजीमय वातावरण आणि तिचे कर्तृत्व या बळावर ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न साकार होऊ शकते.

– पराग फाटक

कॅरम हेच त्यांचे दैवत!

कॅरम या खेळाचे नियम असोत, खेळाडूची कामगिरी किंवा संघटनात्मक माहिती, हे सारे मुखोद्गत आहे ते माजी आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार यांना. मुंबई कॅरम संघटनेचे ऑफिस म्हणजेच केदार यांचे राहते घर. त्यांच्या घरामध्ये कपडे कमी आणि संघटनांच्या फाइल्स अधिक. अशा वातावरणात कोणाचीही बायको त्रागा नक्की करेल. पण अरुण यांची पत्नी अनुपमांना मात्र यामध्ये आनंदच वाटतो, कारण त्याही आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आहेत.

अरुण आणि अनुपमा एकाच काळात कॅरम खेळत होते, त्यामुळे ओळख होणं स्वाभाविक होतं. दोघेही आपल्या खेळात तरबेज होते. चांगले नाव दोघांनीही कमावले होते. पण काही वेळा अनुपमा यांना अरुण मार्गदर्शनही करायचे. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनुपमा यांना १९८३-८४ साली हा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, तर अरुण यांना १९८४-८५ या वर्षी. त्यानंतर १९८६ साली या दोघांनीही लग्न केले, पण लग्नानंतरही त्यांचा कॅरम सुरूच राहिला.

कॅरम म्हणजे या दोघांसाठी दैवतच. साधारणत: घरात जसा देव्हारा असतो, तसा त्यांच्यासाठी कॅरम. प्रत्येक सणाला कॅरमची पूजाही केली जाते. स्वयंपाकघरात जशी मांडणी असते, तसा त्यांच्या घरात नेहमीच कॅरम मांडलेला असतो. कॅरमने त्यांना भरभरून दिले आहे. मान-सन्मान तर दिलाच, पण नोकरीही मिळवून दिली. एकेकाळी कॅरम या खेळाला आणि खेळाडूंनी प्रतिष्ठा नव्हती. पण या दोघांनीही कॅरमवरचे प्रेम कायम ठेवले.

अरुण यांनी १९८५ साली पहिल्या आंतराष्ट्रीय दौऱ्यात तिरंगा फडकवला, तर अनुपमा यांनी १९९६ साली अमेरिकन स्पर्धा जिंकली. या दोन्ही खेळाडूंनी भारताचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले असले तरी त्यांच्या नात्यामध्ये कधीही अहंकार आला नाही. एकमेकांना सावरत, समजून घेत ३० वर्षांमध्ये त्यांचा संसार चांगलाच फुलला असला तरी दुसरीकडे कॅरमच्या संसारातून त्यांनी काडीमोड घेतली नाही. आता जास्त खेळता येत नसले तरी युवा पिढीसाठी आपण काय करू शकतो, याचाच विचार या दोघांच्या मनात असतो, कारण कॅरमचा वसा त्यांनी अंगीकारला आहे.

– प्रसाद लाड

कॅरमने आम्हा दोघांनाही भरभरून प्रेम, आनंद आणि समाधान दिलं. आमच्या पूर्वीच्या पिढीला जे काही मिळू शकलं नाही, ते आम्हाला मिळाल्याचा आनंद आहेच, पण जे आम्हाला मिळालं नाही ते पुढच्या पिढीला देण्याचा आम्ही वसा घेतला आहे. त्यामुळे आता कॅरमच्या विकासासाठी झटताना, एक अनोखा आनंद मिळतो. कॅरम हा खेळ अधिक वृद्धिंगत व्हावा, हीच आम्हा दोघांची इच्छा आहे.

– अरुण केदार

बुद्धिबळ हाच कुंटेंचा श्वास!

फारसे प्रायोजक नाहीत, प्रसारमाध्यमांकडूनही मर्यादित सहकार्य अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ एक नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन बुद्धिबळपटू घडविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र अनेक अडचणींवर मात करीत प्रकाश व मीना कुंटे या पालकांनी भारताला आंतरराष्ट्रीय मास्टर मृणालिनी व ग्रँडमास्टर अभिजित हे दोन

खेळाडू मिळवून दिले. स्वत:च्या पाल्यांबरोबरच महाराष्ट्रातील अनेक नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देण्याचा वारसाही त्यांनी जपला आहे.

मृणालिनी हिने बुद्धिबळात करीअर करण्याचे ठरविले. ती मोहन भागवत या प्रशिक्षकांकडे जात असे. तिला सोबत म्हणून अभिजित हा जात असे आणि बघता बघता त्यालाही या खेळाची आवड निर्माण झाली. त्यानेही या खेळातच करीअर करण्याचा मार्ग स्वीकारला. एकाच वेळी या दोन्ही खेळाडूंना कारकीर्दीकरिता सातत्याने सहकार्य करणे थोडेसे अवघड काम होते. तथापि प्रकाश व मीना यांनी पुणे विद्यापीठातील नोकरी सांभाळत या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. या दोघांना घडवताना किती त्याग करावा लागतो हे कुंटे दाम्पत्याने ओळखले. पुण्यात व पुण्याबाहेर महाराष्ट्रात बुद्धिबळासाठी विपुल प्रमाणात नैपुण्य आहे हे लक्षात घेऊन त्यांनी १९९८ मध्ये बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टची स्थापनी केली. या ट्रस्टमार्फत त्यांनी आतापर्यंत तीन राष्ट्रीय स्पर्धा, फिडे मानांकनाच्या सोळा अखिल भारतीय स्पर्धा, राज्यस्तरावर अकरा स्पर्धाचे आयोजन केले आहे. खेळाडूंसाठी पूर्वी लॅपटॉप ही अतिशय खर्चिक गोष्ट असे. त्यामुळेच या ट्रस्टने आतापर्यंत वीसहून अधिक खेळाडूंना लॅपटॉप दिले आहेत.

अभिजित व मृणालिनी या भावंडांनीही पालकांनी चालविलेले बुद्धिबळ प्रसाराचे व्रत स्वतंत्रपणे सुरू ठेवले आहे. या दोन्ही खेळाडूंनी नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अभिजित याने ‘शाळेत बुद्धिबळ’ हा उपक्रम राज्य संघटनेमार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू केला आहे. खऱ्या अर्थाने बुद्धिबळ हाच कुंटे कुटुंबीयांचा श्वास आहे.

– मिलिंद ढमढेरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 2:27 am

Web Title: sport special on global family day
टॅग : Sport
Next Stories
1 भारतासमोर खडतर आव्हान
2 यंग प्रभादेवी, ओम साई, अंकुर बाद फेरीत
3 युवा चषक फुटबॉल स्पध्रेला आजपासून सुरुवात
Just Now!
X