क्रिकेट हा असा खेळ आहे, की तुम्ही प्रत्येक दिवशी विद्यार्थी असायला हवा. ज्यादिवशी तुम्ही स्वत:ला मास्टर समजायला लागाल त्या दिवसापासून तुमच्या अधोगतीला सुरूवात होते, असं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन सुनील गावसकर यांनी चेन्नई वि. दिल्ली या आयपीएल सामन्याचं समालोचन करताना केलं.

पृथ्वी शॉच्या खेळाचं वर्णन करताना, पृथ्वीच्या खेळामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचं सांगताना त्यानं एका विद्यार्थ्याच्या भूमिकेतून स्वत:ला घडवलं असल्याचं निरीक्षण गावसकर यांनी नोंदवलं. पृथ्वीनं शार्दूल ठाकूरच्या एका षटकात १७ धावा काढताना अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याच्या बँट स्पीडमध्ये, बँट व पँड दरम्यानच्या गँपमध्ये कमालीची सुधारणा झाल्याचे गावसकर यांनी सांगितले. प्रशिक्षक प्रवीण आमरे यांचं कौतुक करताना गावसकर यांनी आमरेंनाही कौतुकाची दाद दिली आहे.

अत्यंत कमी वयात यश अपयशाचे चढ उतार बघितलेल्या पृथ्वीवर भारतीय संघातून डच्चू मिळाला होता. परंतु परत प्रचंड मेहनत करून पृथ्वीनं स्वत:त आश्वासक बदल घडवल्याचे बघायला मिळत आहे. याचीच दखल घेताना प्रत्येक खेळाडूने रोज एक विद्यार्थी भूमिकेतून मैदानावर उतरायला हवं, स्वत:ला मास्टर समजू नये असा मोलाचा सल्ला गावसकरांनी नवोदित खेळाडूंना दिला आहे.

चेन्नईच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीरांनी दमदार कामगिरी नोंदवली. विजय हजारे ट्रॉफीतील आपला फॉर्म शॉनं आयपीएलमध्येही कायम राखला. त्यानं 27 चेडूत आपलं अर्धशतक साकारलं आणि शिखर धवनसोबत शतकी भागीदारी रचली. या सामन्यात पृथ्वीनं 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या.