आयपीएलच्या नव्या पर्वाला आता काही दिवसांचा अवधी बाकी आहे. 9 एप्रिल ते 30 मे अशा दीर्घ कालावधीत आयपीएलचा 14वा हंगाम पार पडेल. या स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांचीही जोरदार चर्चा होते. झटपट क्रिकेटच्या या प्रकारात धावांवर बंधन घालण्यासाठी प्रत्येक संघाला मजबूत क्षेत्ररक्षकांची आवश्यकता असते. हे क्षेत्ररक्षक उत्कृष्ट झेल घेऊन आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतात. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू तुम्हाला माहीत आहे का?

विराट कोहली

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा कर्णधार कोहलीने 190 डावांमध्ये 76 झेल घेतले आहेत. विराट 2013पासून आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत आहे, पण आतापर्यंत त्याचा संघ एकदाही जेतेपद जिंकू शकलेला नाही.

एबी डिव्हिलियर्स

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळलेल्या एबी डिव्हिलियर्सने 122 डावात 83 झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. डिव्हिलियर्स बर्‍याच कालावधीपासून आरसीबीकडून खेळत आहे. यापूर्वी तो दिल्ली संघाकडूनही खेळला आहे.

रोहित शर्मा

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 200 सामन्यांमध्ये 89 झेल घेतले आहेत. मुंबई हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावले आहे.

कायरन पोलार्ड

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या पोलार्डने अनेक वेळा उत्कृष्ट झेल पकडत सर्वांना चकित केले आहे. आयपीएलच्या 164 डावांमध्ये पोलार्डने एकूण 90 झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याच्या बाबतीत पोलार्ड दुसऱ्या स्थानी आहे.

सुरेश रैना

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या विक्रमात सुरेश रैना अव्वल स्थानी विराजमान आहे. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैनाने आतापर्यंत 192 डावांमध्ये 102 झेल पकडले आहेत. या टी-20 लीगमध्ये झेल घेण्याच्या बाबती शतक ठोकणारा रैना एकमेव खेळाडू आहे.