न्यूझीलंडच्या संघावर भारताच्या संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला. विजयासाठी भारताला दिलेले १५६ धावांचे आव्हान भारताने अवघ्या ३५ षटकात पूर्ण केले. या बरोबरच भारताने तब्बल १० वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीत न्यूझीलंडला पराभूत करण्याची किमया केली.

भारतीय संघ २०१३ मध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आला होता. पण ५ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. न्यूझीलंडने ती मालिका ४-० अशी जिंकली होती, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. त्याआधी मात्र २००८ साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षानंतर भारताने न्यूझीलंडच्या भूमीत सामना जिंकला.

प्रखर सुर्यप्रकाशामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे सामन्यातील एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी सामना जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. शिखर धवनने ७५ धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याचे अर्धशतक ५ धावांनी हुकले.

त्याआधी मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला १५७ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. विल्यमसनने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही.

भारताकडून कुलदीप यादवने ४ तर मोहम्मद शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने २ तर केदार जाधवने १ विकेट घेत चांगली साथ दिली. या मालिकेतला दुसरा सामना २६ जानेवारी रोजी होणार आहे.