|| ऋषिकेश बामणे

मुंबई : करोनाच्या साथीमुळे अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच खो-खो खेळालाही मोठय़ा प्रमाणावर हादरा बसला. त्यामुळे सद्य:स्थिती पाहता प्रामुख्याने महाराष्ट्रातील खो-खोला पुन्हा उभारी देण्यासाठी पुन्हा एकदा शुन्यातून सुरुवात करावी लागेल, अशी चिंता भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली. याशिवाय शासनाने खेळाडूंना प्राधान्याने लसीकरणाची सुविधा पुरवली पाहिजे, असेही मत जाधव यांनी मांडले.

गतवर्षी मार्च महिन्यापासून करोनाचा शिरकाव झाला आणि खो-खोची मैदाने सुनी पडली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी सर्वच वयोगटांच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा रद्द करावी लागण्याची शक्यता आहे. तरीही यादरम्यान खो-खोपटूंचे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा खच्चीकरण होऊ नये, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. खो-खोची सध्याची स्थिती आणि भविष्यातील आव्हानांबाबत जाधव यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

’  करोनाचा खो-खो खेळावर कितपत परिणाम झाला?

खो-खो हा मैदानी खेळ असल्याने यामध्ये खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे करोनाने एकप्रकारे खो-खोच्या मुळावरच घाव केला. गेले वर्ष जवळपास वाया गेल्यावर जानेवारी—फेब्रुवारीदरम्यान स्थिती थोडीफार सुधारली आहे, असे दिसून आले. देशासह राज्यातही अन्य क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाला प्रारंभ झाल्याने आम्हीसुद्धा या वर्षांची रूपरेषा आखली. त्यानुसार राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाची तयारीही सुरू केली. अल्टिमेट लीगची चाचपणी स्पर्धाही सुरळीतपणे झाली. परंतु मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या सर्व गोष्टींवर पाणी फेरले गेले.

’  खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धा अन्य राज्यांत खेळविण्याचा विचार आहे का?

सध्या महाराष्ट्रात प्रवासावर इतकी र्निबध आहेत की खेळाडूंना एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाणेही कठीण आहे. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातही तेथील प्रशासनाने विविध नियम बनवले आहेत. त्यामुळे अन्य राज्यांत राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करणे जोखमीचे ठरू शकते. जरी स्पर्धा आयोजित केली तरी त्यापूर्वी खेळाडूंच्या सरावासह आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण आवश्यक आहे.

’  सद्य:स्थितीतून सावरण्यासाठी खो-खोला किती वेळ लागेल?

सध्याच्या आव्हानात्मक काळात खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यामुळे महासंघाकडून त्यांच्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु खेळाडूंचे मैदानावर कधी पुनरागमन होईल, हे ठामपणे कोणीच सांगू शकणार नाही. मुळात खेळाडूंचा सर्वागीण विकास थांबल्याने त्यांना आता पुन्हा स्वत:ची सर्वोत्तम लय प्राप्त करण्यासाठी किमान वर्षभराचा अवधी लागेल. उन्हाळ्यात युवा खो-खोपटूंचा शोध घेतला जातो. परंतु यंदाही ते शक्य नाही. खो-खोने गेल्या ४-५ वर्षांत महाराष्ट्रासह देशात वेगळा दर्जा मिळवला होता. मात्र सध्या सगळ्या गोष्टी या खेळासाठी प्रतिकूल घडत आहेत. त्यामुळे यातून लवकरात लवकर सावरण्यासाठी आणि राज्यात पुन्हा एकदा खो-खोमय वातावरण निर्माण करण्यासाठी किमान दोन वर्षे जातील. म्हणजे एकप्रकारे आम्हाला खो-खोला उभारी देण्यासाठी शुन्यातूनच सुरुवात करावी लागेल, असे मला वाटते.

आठवडय़ाची मुलाखत  चंद्रजीत जाधव, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव