आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटही सुरू झालं आहे. क्लब क्रिकेटमध्ये दररोज वेगवेगळ्या आणि विचित्र घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी एका क्लब क्रिकेट सामन्यात एका गोलंदाजाने मुद्दाम फलंदाजाला चेंडू फेकून मारल्याची घटना घडली. त्याबद्दल त्या संघाला पाच धावांचा दंड करण्यात आला. पण सध्या एका सामन्यात खिलाडूवृत्तीला साजेशी अशी एक घटना घडली.

‘ससेक्स क्रिकेट लीग एनकाऊंटर’मधील ‘ऑगस्ट कप’ स्पर्धेचा एक सामना सुरू होता. थ्री ब्रिजेस क्रिकेट क्लब विरूद्ध प्रिस्टन नोमाड्स असा सामना रंगला होता. या सामन्यात थ्री ब्रिजेस संघाचा आठवा आणि नववा गडी सलग दोन चेंडूवर बाद झाला. त्यामुळे ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजावर हॅटट्रिक चेंडू खेळण्याची वेळ आली होती. ११व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानात आल्यावर प्रतिस्पर्धी संघाला हॅटट्रिक मिळणार असंच वाटत होतं पण अखेरच्या फलंदाजाने जे केलं ते पाहून सारेच थक्क झाले.

पाहा ११व्या फलंदाजाने काय केलं…

सहसा हॅटट्रिक हुकवण्यासाठी चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळला जातो. पण त्या खेळाडूने स्कूप शॉट खेळत चेंडू थेट किपरच्या डोक्यावरून सीमारेषेपार पोहोचवला. असा फटका खेळण्यासाठी धाडस दाखवल्याबद्दल प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीदेखील टाळ्या वाजवून त्या फलंदाजाचं कौतुक केलं.