केवळ क्रिकेट विश्वातच नाही, तर जाहिरात जगतातही विराट कोहली नवे विक्रम प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे. देशाविदेशातील कोणत्याही एका कंपनीला आपली जाहीरात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत करायची असेल तर कोहलीच्या एका दिवसाच्या शूटसाठी कंपनीला तब्बल पाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. जाहिरात विश्वात विराट कोहली हा आता एक मोठा ब्रॅण्ड झाला आहे. सर्व सेलिब्रिटींना मागे टाकून कोहली एका दिवसात सर्वाधिक मानधन घेणारा स्टार ठरला आहे.

गेल्या वर्षापर्यंत कोहली एका दिवसाच्या जाहिरात चित्रीकरणासाठी अडीच ते साडेतीन कोटी मानधन घेत होता. कोहली पेप्सिको कंपनीसोबतच्या जाहिरात कराराचे नुतनीकरणासाठी आपल्या मानधनात वाढ करून घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पेप्सिको कंपनीच्या कोकाकोला या उत्पादनावर आरोग्यासाठीची शंका उपस्थित केली जात असल्याने या कंपनीसोबत करार करावा की नाही या संभ्रमात कोहली आहे.

 

येत्या ३० एप्रिलपर्यंत कोहलीचा पेप्सिकोसोबत करार आहे. त्यानंतरही करार कायम राखण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्याच महिन्यात कोहलीने जर्मनीच्या ‘प्यूमा’ या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी ८ वर्षांसाठी तब्बल ११० कोटींचा करार केला आहे. कोहलीने जाहिरात विश्वात एका दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, रणवीर आणि रणबीर कपूर यांना मागे टाकले आहे. गेल्याच वर्षी पेप्सिको कंपनीने गेल्या ११ वर्षांपासूनचा धोनीसोबतचा करार संपुष्टात आणला होता.
प्यूमासोबतच कोहलीचा ऑडी कार, एमआरएफ टायर्स, टिस्कॉट वॉचेस, जिओनी मोबाईल, बूस्ट, कोलगेट टूथपेस्ट आणि विक्स या अग्रगण्य ब्रॅण्ड्ससोबत करार केला आहे.