ओव्हल येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लड कसोटीतील चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची आवश्यकता आहे.  मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सामन्याचे तिन्ही निकाल शक्य असून इंग्लंडने सामना जिंकला तर ते मालिकेमध्ये आघाडी घेतील. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विराटसेनेचं पारडं २-१ ने जड होईल. तर सामना अनिर्णित राहिल्यास पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. दरम्यान या सामन्याआधी अनेक शक्यतांची चर्चा केली जात असतानाच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक मोलाचा सल्ला दिलाय.

भारतीय संघाच्या निवडीवरुन चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच विराटवर टीका करणाऱ्या वॉनने आता पाचव्या दिवशी भारताने गोलंदाजीला सुरुवात करताना रविंद्र जाडेजाच्या हाती चेंडू द्यावा असं म्हटलं आहे. भारतासाठी या सामना फार महत्वाचा असून त्यातही गोष्टी सरळ आणि सोप्या ठेवायच्या असल्यास विराटने पाहिल्या तासाभरात जाडेजाचा जास्तीत जास्त वापर करुन घ्यावा, असं म्हटलं आहे. जाडेजाने नंतर खेळपट्टी फिरकीला साथ देत नसताना गोलंदाजी करण्यात काही अर्थ नाहीय. कोहलीने साचेबद्ध विचारसरणीने विचार न करता हटके विचार करण्याची गरज असल्याचं मत वॉनने व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> पाचव्या दिवशी कोणाचं पारडं जड? भारत की इंग्लंड?; पाहा आकडेवारी काय सांगते

क्रिकबझशी बोलताना वॉनने पाचव्या दिवसाला भारताची रणनिती काय असावी यासंदर्भात भाष्य केलंय. “मला वाटतं विराटने पहिल्या तासाभराच्या खेळात गोष्टी साध्या, सरळ आणि सोप्या ठेवाव्यात. माझ्या मते त्याने फिरकी गोलंदाजापासून सुरुवात करावी. त्याने जाडेजाकडून गोलंदाजी करुन घ्यावी. ऑफ स्टम्पच्या बाहेर असणाऱ्या रफ पॅचेसची मदत त्यांना घेता येईल. मात्र त्याने काही झालं नाही तर त्यांनी हे सबकॉन्टीनेंटमधील खेळपट्या असणारं मैदान आहे असं समजून साचेबद्ध विचार सोडून हटके विचार करायला पाहिजे. बुमराह सारख्या गोलंदाजाने पाचव्या दिवशी स्लो चेंडूंचा अधिक वापर केला पाहिजे. अशा चेंडूंचा पाचव्या दिवाशी फार जास्त प्रभाव पडेल,” असं वॉन म्हणालाय.

भारताला संधी कारण…

भारताविरोधात चौथ्या डावामध्ये ३५० धावांहून अधिक लक्ष्य कोणत्याच संघाला पूर्ण करता आले नाही ही जमेची बाजू असली तरी दुसरीकडे इंग्लंडने असा पराक्रम ऑस्ट्रेलियाविरोधात केलाय. ऑस्ट्रेलियाविरोधात इंग्लडने चौथ्या डावात ३६२ धावा करुन सामना जिंकला होता. भारत जिंकण्याची शक्यता अधिक असणाऱ्याचं कारणं म्हणजे आकडेवारी. भारताने ३०० पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य देऊन सामना गमावल्याची घटना एकदाच घडलीय आणि ती सुद्धा ४४ वर्षांपूर्वी. त्यानंतर भारताविरोधात कोणत्याही संघाला धावांचा ३५० पलीकडील टप्पा चौथ्या डावात गाठता आला नाही. सध्याची भारतीय संघाची गोलंदाजी पाहिल्यास ती फारच संतुलित असून या गोलंदाजीसमोर इंग्लंड वेगाने धावा करेल अशी शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरसारखे गोलंदाज भारताकडे आहेत. तर फिरकीमध्ये रवींद्र जडेजाकडून काही विकेट्सची अपेक्षा आहे.

इंग्लंडला संधी कारण…

इंग्लंडचा संघ विजयी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ३६८ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेरीस यजमान संघाने ७७ धावा केल्या असून त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिलीय. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील काही तास इंग्लंडचे फलंदाज संभाळून खेळले आणि त्यांच्या फार विकेट्स गेल्या नाही तर भारतासाठी चौथ्या कसोटीचा पेपर अवघड जाऊ शकतो. ओवलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अजूनही चांगली असल्याचं सांगितलं जात आहे. इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाज फारच सुंदर खेळ करत आहेत. जो रुट, जॉनी बेयरस्ट्रो संपूर्ण मालिकेत चांगले खेळलेत. ओली पॉप आणि क्रिस वोक्सने या सामन्यात तर डेविड मलानने मागील सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. मोईन अलीसुद्धा चांगली फलंदाजी करतोय.

इंग्लंडच्या बाजूने पारडं जड असण्याचं कारण म्हणजे ते ओवलवर फार वेगाने धावा काढतात. इंग्लडने याच मैदानामध्ये २००७ साली चौथ्या डावामध्ये ११० षटकांमध्ये ६ खेळाडूंच्या मोबदल्यात ३६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी याच वेगाने फलंदाजी करावी लागणार आहे. पहिल्या सत्रातील खेळावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. जो संघ पहिलं आणि दुसरं सत्र चांगल्या पद्धतीने खेळून काढेल त्याच्या विजयाच्या आशा वाढणार आहेत.