ऑस्ट्रेलियाच्या गतीमान गोलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘शॉर्ट-पिच’ गोलंदाजीवर भारतीय संघाचा धुव्वा उडविल्यानंतर आता जयपूर येथे होणाऱया दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सर्व तयारीनिशी सज्ज झाला असल्याचे संघाचा उप-कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
विराट म्हणाला, पहिल्या अपयशातून आम्हाला चांगला धडा मिळाला आहे. त्यावरून आम्ही सरावादरम्यान फलंदाजीसाठी योग्य फटकेबाजीच्या सुत्रांवर लक्ष्य केंद्रीत केले.
शॉर्ट पिच गोलंदाजीवर बोलताना विराट म्हणाला, शार्ट पिच गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी कोणत्या वेगळ्या सरावाची गरज नसते. सर्वच संघांमध्ये शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते. फक्त एवढेच की पहिल्या सामन्यात आमच्या फलंदाजांनी योग्य फटके मारले नाहीत. त्यामुळे विकेट्स जात राहिल्या आणि अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु, याची कसर आम्ही दुसऱया सामन्यात नक्कीच भरून काढू असा विश्वासही विराटने व्यक्त केला आहे.
उसळी गोलंदाजी भारतीय फलंदाजांना आव्हान ठरते का?
विराट म्हणला, मला असे अजिबात वाटत नाही. जर मी आंतराष्ट्रीय स्तरावर खेळत असेन तर, मला सर्व प्रकारची गोलंदाजी खेळता आली पाहिजे. फक्त त्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास जवळ बाळगावा लागतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका संघाविरोधात खेळत असताना उसळी गोलंदाजीचा प्रश्वचिन्ह प्रत्येकवेळा भारतीय संघासमोर का उपस्थित केला जातो हेच मला समजत नाही असेही विराटने स्पष्ट केले.