|| ऋषिकेश बामणे

रमेश पोवार, मुंबईचे प्रशिक्षक : – मुंबई : स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधील बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवणे कधीच सोपे नसते. परंतु मुंबईतील क्रिकेट जवळचे असल्याने तसेच स्वत:ला उत्तम प्रशिक्षक म्हणून पुन्हा सिद्ध करण्यासाठी आपण तात्काळ स्वरूपावर ही भूमिका स्वीकारली, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी व्यक्त केली. भविष्यात दीर्घ काळासाठीदेखील मुंबईला मार्गदर्शन करायला आवडेल, अशी इच्छा पोवार यांनी प्रदर्शित के ली.

गेल्या आठवड्यातच भारताचे माजी फिरकीपटू ४२ वर्षीय पोवार यांची आगामी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईची सर्व प्रकारच्या स्थानिक स्पर्धांमधील कामगिरी ढासळलेली असल्याने कमी कालावधीत मुंबईला यशाचा मार्ग दाखवण्याबरोबरच प्रशिक्षक म्हणून छाप पाडण्याचे आव्हान पोवार यांच्यापुढे आहे. भारतीय महिला संघ तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या पोवार यांच्याशी २० फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर केलेली ही खास बातचीत-

मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या आव्हानाकडे तुम्ही कशा रीतीने पाहता?

फक्त १० ते १५ दिवसांच्या कालावधीत एका स्पर्धेसाठी एखाद्या संघाला मार्गदर्शन करणे कोणालाच आवडत नाही. त्यातच जर तो मुंबईसारखा बलाढ्य संघ असल्यास तुम्ही प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी अनेकदा विचार करता. परंतु मुंबईतील क्रिकेटने मला सर्व काही दिले आहे. येथील क्रिकेटच्या प्रेमापोटीच मी तात्काळ प्रशिक्षकपद स्वीकारले. त्यामुळे आता अधिक पुढील विचार न करता मी या आव्हानासाठी तयारीला लागलो आहे. हजारे स्पर्धेत मुंबईने दमदार कामगिरी केल्यास माझे प्रशिक्षकपद संघाला फळल्याचे आपोआप सिद्ध होईल. मात्र भविष्यात संधी मिळाल्यास दीर्घ काळासाठीदेखील मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळण्यासाठी मी सज्ज आहे.

गेल्या काही वर्षांतील मुंबईच्या कामगिरीविषयी तुमचे काय मत आहे?

मुंबईच्या संघात अनेक प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे, परंतु आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात ते अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्रशिक्षक या नात्याने मी प्रत्येक खेळाडूला स्वत:चा सर्वोत्तम खेळ करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. मुंबईतील नामांकित फलंदाजांविषयी नेहमीच सगळीकडे चर्चा रंगते. मात्र आपले गोलंदाजसुद्धा कौशल्यवान असून आताच्या संघातीलच बहुतांश गोलंदाज २०१८-१९च्या विजयी संघाचा भाग होते. त्यामुळे यंदा ते नक्कीच खेळ उंचावतील, अशी अपेक्षा आहे. २०२० मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असणाऱ्या यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर या युवा खेळाडूंकडे छाप पाडण्याची ही सुवर्णसंधी आहे.

जयपूरच्या खेळपट्ट्या मुंबईच्या खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरतील का?

मुंबईचे सर्व साखळी सामने जयपूर येथे होणार असून आम्ही स्पर्धेच्या आठ-नऊ दिवस आधीच येथे दाखल झालो आहोत. यशस्वी आणि धवल कुलकर्णी ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा अन्य खेळाडूंनाही होईल. हजारे स्पर्धा ५० षटकांची असल्याने फिरकीपटू येथे मोलाची भूमिका बजावतील. एकंदर खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज घेतल्यावरच आम्हाला योग्य संघाची निवड करता येईल.

 जैव-सुरक्षेच्या वातावरण आणि विलगीकरणाच्या नियमांविषयी तुम्हाला काय वाटते?

करोनानंतरच्या काळात जैव-सुरक्षित वातावरण क्रिकेटचा भाग झाला असून खेळाडूंना विलगीकरणांच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. काही क्रीडापटूंनी यासंबंधी तक्रार केल्याचे माझ्या निदर्शनास आले. परंतु क्रीडापटूच्या आयुष्यात अशाप्रकारची आव्हाने येतच असतात. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंना या वातावरणाची सवय झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कामगिरीवर या वातावरणाचा काहीही परिणाम होईल, असे मला वाटत नाही.