भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा गेल्या काही वर्षांमधला महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीच्या, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तब्बल २ वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकत चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी ही विशेष वाखणण्याजोगी होती. जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत पुन्हा आपलं महत्व सिद्ध केलं. मात्र २०२० सालात भारताला टी-२० विश्वचषकात सहभागी व्हायचं आहे. बुमराह सध्या जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी काळातील महत्वाच्या स्पर्धा लक्षात घेता, बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये विश्रांती देणं गरजेचं असल्याचं मत भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी व्यक्त केलं आहे.

“भारतामध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये बुमराहला विश्रांती द्यायला हवी. त्याच्यासारख्या गुणी गोलंदाजावर अधिक भार येता कमा नये. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुमराह हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र तो भारतीय खेळपट्ट्यांवरही बळी घेऊ शकतो हे जगाला दाखवून देण्याची काहीच गरज नाहीये. सध्याच्या वातावरणात बुमराहवर अधिक ताण न येणं महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला भारताला आपल्या खात्यात गुण मिळणं गरजेचं आहे.” हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत चेतन शर्मा बोलत होते.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ हा यशस्वी संघापैकी एक मानला जातो. जसप्रीत बुमराहचा भारताला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये यशस्वी बनवण्यामध्ये मोठा वाटा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेनंतर आता ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेत बुमराह कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.