09 July 2020

News Flash

‘बिंदगीहाळ पॅटर्न’मुळे आता ‘चक दे लातूर’!

हॉकी हा खेळ शहरी भागातील विद्यार्थ्यांचा असा समज आहे.

राज्यस्तरावर शालेय हॉकीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बिंदगीहाळच्या हॉकीपटू.

लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ या गावाची नवी ओळख राज्यातील महिला हॉकीपटूंचे गाव अशी होत आहे. गेल्या १४ वर्षांपासून या गावात मुलींना हॉकी शिकवण्याचे काम सुरू आहे. त्यातून देशपातळीवर दोघींनी तर राज्यपातळीवर सुमारे २०० मुलींनी आपला सहभाग नोंदवला आहे.

हॉकी हा खेळ शहरी भागातील विद्यार्थ्यांचा असा समज आहे. ग्रामीण भागात साहित्य उपलब्ध होणे दुर्मीळ असते. लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ गावात हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक ही शाळा चालते. शेषेराव शिंदे हे संस्थाचालक तर गावातीलच राष्ट्रीय खो-खो पटू असणारे काकासाहेब शिंदे हे या शाळेत शिक्षक आहेत. २००३ साली आपल्या शाळेतील मुलांचा हॉकी संघ तयार करायचा असा विचार पुढे आला. त्या काळी संस्थेने २५ हजार रुपये खर्च करून मुलांना खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले. एक वष्रे खेळल्यानंतर ते साहित्य खराब झाले. त्यामुळे मुलांना फुटबॉलच्या खेळाकडे वळविले तर मुलींचा हॉकीचा संघ तयार करण्यात आला.

नियमितपणे मुलींनी मेहनत करणे सुरू केले अन् पाहता पाहता विभागात मुलीचा संघ तुल्यबळ ठरला. या गावातील निकिता कदम व स्वप्ना शिंदे या मुलींनी राष्ट्रीय शालेय हॉकी संघात प्रतिनिधित्व केले आहे. राज्यस्तरावर खेळणाऱ्या गावातील सुमारे दोनशे मुली आहेत. पाचवीपासूनच मुलींना हॉकीची आवड निर्माण केली जाते व दहावीपर्यंत ती मुलगी अतिशय तरबेज हॉकीपटू म्हणून आपले नाव कमावते. ग्रामीण भागात साहित्य उपलब्ध होत नाही. त्यासाठी आíथक अडचण असते. मध्यंतरी रोटरी क्लबने खेळाचे साहित्य घेऊन दिले. आता पालक यात रस घेत आहेत. या शाळेत बोकनगाव, कवठा, फकरानपूरवाडी अशा आसपासच्या गावातील मुले, मुली शिकायला येतात व याही गावात आता हॉकीचे आकर्षण निर्माण झाले आहे.

एकाच वेळी या शाळेचे हॉकीचे मुलींचे दोन संघ खेळतात. संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात इतक्या आवडीने हॉकी खेळणाऱ्या मुली केवळ बिंदगीहाळ या गावात आहेत. २९ ऑगस्ट हा प्रसिद्ध हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. तो क्रीडा दिन म्हणूनही साजरा केला जातो. बिंदगीहाळच्या मुलींकडे राज्याच्या क्रीडा विभागाने विशेष लक्ष दिले. त्यांच्यासाठी खास प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केली तर हे गाव देशाच्या नकाशावर येऊ शकते. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील हॉकी संघ हा कसा यशस्वी होतो हे चित्रपटात पाहिल्यानंतर असे केवळ चित्रपटात घडते, असा अनेकांचा समाज होतो. मात्र बिंदगीहाळच्या मुलींनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:32 am

Web Title: women hockey in latur
Next Stories
1 अखेरच्या क्षणी हातून सामना निसटला
2 ला लिगा स्पर्धेत औस्मन डेम्बेले ठरला नेमारनंतर सर्वात महागडा खेळाडू
3 रणजी स्पर्धेच्या हंगामाची घोषणा, मुंबईसमोर तुल्यबळ संघांचं आव्हान
Just Now!
X