आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम बहरात असलेला रोहित प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित सध्या अग्रस्थानी आहे. फलंदाजीत रोहितचा झंझावात रोखणे अवघड असतानाच, त्याने एकाच विश्वचषकात पाच शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरच्या विश्वचषक स्पर्धेतील सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
सचिन तेंडुलकरच्या एका विश्वचषकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून रोहित २७ धावांच्या अंतरावर आहे. सचिन तेंडूलकरने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत ६७३ धावा केल्या होत्या. आतापर्यंत एखाद्या विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर आहेत. तो विक्रम अद्याप अबाधित आहे. रोहित शर्माकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात ६४७ धावा केल्या आहेत. सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला २७ धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने रोहितची तुफान फलंदाजी सुरू आहे, ती पाहता तो या स्पर्धेतच हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा –
सचिन तेंडुलकर – ६७३ धावा (२००३)
मॅथ्यू हेडन – ६५९ धावा (२००७)
रोहित शर्मा – ६४७ धावा* (२०१९)
माहेला जयवर्धने – ५४८ धावा (२००७)
मार्टीन गप्टील – ५४७ धावा (२०१५)
कुमार संगकारा – ५४१ धावा (२०१५)
रिकी पाँटिंग – ५३९ धावा(२००७)
रोहित शर्माच्या नावावर आणखी एक जागतिक विक्रम होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने आणखी ५३ धावा केल्यास विश्वचषकात ७०० धावा करणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. त्याशिवाय उर्वरित सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली तर विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहितच्या नावावर जमा होणार आहे. सध्या हा विक्रम सचिन आणि रोहित यांच्या नावावर आहे. दोघांनीही विश्वचषकात सहा शतके झळकावली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरने सहा विश्वचषकात तर रोहित शर्माने दुसऱ्याच विश्वचषकात सहा शतके झळकावली आहेत.