विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्यात अपयशाचा सामना करावा लागला. टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाने वन-डे आणि कसोटी मालिका गमावली. दोन्ही मालिकेत भारताला व्हाईटवॉश स्विकारावा लागला. कसोटी मालिकेत विराट कोहलीने वृद्धीमान साहाला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. विराट कोहलीच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र वृद्धीमान साहाने, आपल्यासाठी संघाचा विजय अधिक महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

“याआधीच्या कसोटी मालिकेत तुम्ही खेळत होतात, त्यामुळे या मालिकेतही तुम्हाला संधी मिळेल असं वाटत असतं. पण संघ व्यवस्थापनाचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागतो. माझ्यासाठी संघाचा विजय हा नेहमी महत्वाचा आहे. जर संघाने निर्णय घेतला असेल की ऋषभला संधी मिळाली पाहिजे तर मला काहीच अडचण नाही. संघ जिंकला पाहिजे.” Sportsstar संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत साहा बोलत होता.

२०१९ हे साल ऋषभ पंतसाठी अतिशय खराब गेलं होतं. विश्वचषकानंतर निवड समितीने पंतला धोनीच्या जागी संधी दिली. मात्र त्याला मिळालेल्या संधीचा लाभ घेता आला नाही. यावर उपाय म्हणून विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत पंतला विश्रांती देऊन साहाला संधी दिली. नवीन वर्षात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही लोकेश राहुलने यष्टीरक्षण करत सर्वांना धक्का दिला. मात्र कसोटी सामन्यात साहाऐवजी पंतची झालेली निवड ही आश्चर्यकारक होती.