ऑस्ट्रेलियातील स्थानिक बिग बॅश लिग स्पर्धेत खेळणारा युवराज सिंह हा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. ‘द सिडनी मॉर्गिंग हेराल्ड’ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराजने बिग बॅश स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवलेली आहे. युवराजचा मॅनेजर जेसन वॉर्न यानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून बिग बॅश लिगमध्ये कोणता संघ युवराजला घेण्यासाठी उत्सुक आहे याची चाचपणी सध्या सुरु आहे. यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलणं सुरु असल्याची माहिती जेसन वॉर्नने दिली.

बीसीसीआयच्या नियमानुसार भारताकडून खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला परदेशी टी-२० लिगमध्ये सहभागी होता येत नाही. त्याला इतर देशांतील लिगमध्ये खेळायचं असल्यास बीसीसीआयकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. युवराज सिंहने वर्षभरापूर्वीच आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व गोष्टी जुळून आल्यास युवराज बिग बॅश लिग स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरु शकेल. Australian Cricketers’ Association चा अध्यक्ष शेन वॉर्ननेही युवराजने बिग बॅश स्पर्धेत खेळण्यासाठी तयारी दाखवल्याबद्दल त्याचं स्वागत केलंय. भारतीय खेळाडू या स्पर्धेत आल्यास स्पर्धेच्या प्रसिद्धीवर खूप मोठा फरक पडेल असं मत वॉर्नने व्यक्त केलंय. त्यामुळे कोणाता संघ युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.