भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयने निवेदन जाहीर केले आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजेच २७ मे पर्यंत मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयकडून अनेक माजी क्रिकेटपटूंना मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क साधला गेला आहे, मात्र प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव अद्याप कुणीही स्वीकारलेला नाही. रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग आणि अँडी फ्लॉवर असे दिग्गज क्रिकेटपटू प्रशिक्षक पदासाठी नकार देत आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू जस्टिन लँगरचे एक विधान समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणातील खळबळ वाढली आहे.

जस्टिन लँगरने काही दिवसांपूर्वी बीबीसी पॉडकास्टमध्ये सांगितले की, भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करणे ही एक चांगली संधी आहे. मात्र मी जाणीवपूर्वक यापासून लांब राहत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा चार वर्षांपर्यंत मी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. खरं सांगायचे तर हे काम अतिशय दमवणारे आहे.

रिकी पॉंटिंगने भारताचा प्रशिक्षक होण्याची ऑफर नाकारली, स्वत: सांगितलं यामागचं कारण

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यास काय अडचण आहे? असा प्रश्न विचारला असतान जस्टिन लँगरने केएल राहुलबरोबर झालेला संवाद सांगितला. तो म्हणाला, “मी केएल राहुलशी या विषयावर गप्पा मारत होतो. तेव्हा तो म्हणाला, “आयपीएलमध्ये जितका तणाव आणि राजकारण (प्रेशर आणि पॉलिटिक्स) दिसतं, त्यापेक्षा हजारपट राजकारण भारतीय संघात आहे.” मला वाटतं, केएल राहुलने मला एक चांगला सल्ला दिला.”

भविष्यात कधी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर घेणार का? या प्रश्नावर उत्तर देताना लँगरने नाही असे उत्तर दिले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जस्टिन लँगर लखनौ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक

जस्टिन लँगर आणि केएल राहुल यावर्षी एलएसजी संघासाठी एकत्र काम करत आहेत. यंदाच्या आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला एलएसजीचा संघ गुणतालिकेत चांगल्या स्थानावर होता. मात्र त्यानंतर त्यांना सूर गवसला नाही. याआधी जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून चार वर्ष काम पाहिले. लँगरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाला सँडपेपर गेट प्रकरणातून बाहेर पडण्यास मदत झाली. तसेच त्यांच्या कार्यकाळातच ऑस्ट्रेलियन संघाने ॲशेस आणि टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.