भारतीय संघाने वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत अंतिम फेरी गाठली आहे. सात जेतेपदं नावावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला चीतपट करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. २०१७ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा निसटता पराभव झाला होता. जिव्हारी लागणाऱ्या त्या पराभवातून बोध घेत भारतीय संघाने दमदार वाटचाल केली आहे. या वाटचालीत बीसीसीआयचा मोलाचा वाटा आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटसाठी आखलेली ध्येयधोरणं आणि राबवलेल्या योजनांचा आढावा घेऊया.

लखनौ इथे १९७३ मध्ये महेंद्रकुमार शर्मा यांनी वूमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात WCAIची स्थापना केली. बेगम हमीदा हबीबुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचं कामकाज सुरू झालं. त्याचवर्षी पुण्यात बॉम्बे, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा तीन संघांचा सहभाग असलेली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चंद्रा त्रिपाठी आणि प्रमिलाबाई चव्हाण यांनी शर्मा यांच्या बरोबरीने महिला क्रिकेटच्या वाटचालीसाठी महत्त्वाचं योगदान दिलं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटचं नियमन इंटरनॅशनल वूमन्स क्रिकेट काऊंसिल ही संघटना करत असे. तब्बल ३२ वर्षानंतर २००५ मध्ये ही संघटना आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत विलीन झाली. याचाच परिणाम होऊन २००६ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटचं प्रशासन ताब्यात घेतलं. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा क्रांतीकारी क्षण होता. कारण पैसा, संसाधनं, प्रेक्षकवर्ग, व्यवस्था याबाबतीत बीसीसीआयकडे ठोस यंत्रणा आहे. याचा फायदा महिला क्रिकेटपटूंना मिळू लागला.

लॉजिस्टिक्स बदललं

बीसीसीआयने महिला क्रिकेटची सूत्रं हाती घेण्यापूर्वी महिला खेळाडूंना स्पर्धेला जाण्यायेण्यासाठी, राहण्यासाठी पैसे खर्च करावे लागत. महिला खेळाडू देशांतर्गत स्पर्धांना रेल्वेने जात असत. रिझर्व्हेशन मिळालं नाही तर जनरल डब्यातून प्रवास करत असत. हे चित्र बदललं. आता भारतीय महिला संघ विमानाने प्रवास करतो. त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था असते. पुरुष संघाप्रमाणे महिला संघही पंचतारांकित हॉटेलात वास्तव्यास असतो. महिला संघासाठी स्वतंत्र सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यात आला. मुख्य प्रशिक्षक, क्षेत्ररत्रण प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर, व्हीडिओ अॅनालिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच असं स्वतंत्र दळ महिला संघासाठी पडद्यामागून काम करतं. महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसाठीही यंत्रणा असते.

एनसीएचा आधारवड

क्रिकेटपटूंना दुखापती होण्याची शक्यता असते. दुखापत झाल्यानंतर रिहॅबसाठी तसंच हंगाम नसताना सराव तसंच नव्या मालिकेसाठी तयार होण्यासाठी बीसीसीआयतर्फे बंगळुरू इथे नॅशनल क्रिकेट अकादमी चालवली जाते. महिला क्रिकेटपटूंना या सुसज्ज यंत्रणेचा लाभ मिळू लागला. एनसीएमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या बरोबरीने ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट असतात. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याला एनसीएत पाठवलं जातं. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आवश्यक गोष्टी पुरवल्या जातात. तो किंवा ती पुन्हा मैदानावर लवकरात लवकर परतावा यासाठी तज्ज्ञ मंडळी कार्यक्रम आखतात. खाण्यापिण्याचं, व्यायामाचं शेड्युल दिलं जातं. प्रत्येक खेळाडूच्या शरीराचा अभ्यास करून त्यांना कोणता व्यायाम आवश्यक आहे, दुखापती होऊ नयेत यासाठी काय करावं यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन केलं जातं. या सगळ्याचा खर्च बीसीसीआय उचलतं. महिला क्रिकेटपटूंना याचा उत्तम फायदा झाला आहे.

वार्षिक करार आणि मॅच फीमध्ये घाऊक वाढ

बीसीसीआयने महिला क्रिकेट प्रशासन ताब्यात घेतल्यानंतर दहा वर्षांनी महिला क्रिकेटपटूंसाठी वार्षिक करार व्यवस्था अमलात आणली. देशभरातल्या टॉप २० खेळाडूंना बीसीसीआयतर्फे वार्षिक करारबद्ध केलं जातं. खेळाडूंच्या अ,ब,क अशा श्रेणी असतात. कर्णधार तसंच तिन्ही प्रकारात सातत्याने दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडू अ गटात असतात. श्रेणीनिहाय मानधनाचा स्तर बदलतो. वार्षिक करारामुळे महिला क्रिकेटपटूंना आर्थिक स्थैर्य मिळालं. कॉर्पोरेट व्यवस्थेत कर्मचाऱ्यांना पगाराची व्यवस्था असते तसं बीसीसीआयतर्फे खेळाडूंना वर्षभरासाठी करारबद्ध करून मानधन दिलं जातं. सद्यस्थितीत लागू असलेल्या रचनेत देशभरातल्या १६ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं आहे. अ श्रेणीत ३, ब श्रेणीत ४ तर क श्रेणीत ९ खेळाडूंचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त २०२२ मध्ये बीसीसीआयने महिला खेळाडूंनाही पुरुषांप्रमाणेच मॅच फी मिळेल असं जाहीर केलं. महिला क्रिकेटपटूंसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. असा बदल करणारी बीसीसीआय दुसरीच संघटना आहे. भारताआधी न्यूझीलंडने अशी व्यवस्था अंगीकारली होती. नव्या रचनेनुसार महिला क्रिकेटपटूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त प्रति टेस्ट १५ लाख, प्रति वनडे ६ लाख तर प्रति टी२० खेळण्यासाठी ३ लाख रुपये मानधन देण्यात येतं. आधीच्या व्यवस्थेनुसार महिला खेळाडूंना टेस्ट मॅच खेळण्यासाठी ४ लाख रुपये मानधन मिळायचं. वनडे आणि टी२०साठी प्रत्येकी १ लाख असं मानधन मिळत असे. मात्र यामध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. टेस्टच्या मानधनात २७५ टक्के, वनडेच्या २७५ तर टी२०च्या मानधनात ५०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. ज्या खेळाडूंचा वार्षिक करारात समावेश नाही त्यांच्यासाठी मॅच फी हा कमाईचा मुख्य स्रोत आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय फलदायी ठरला.

वूमन्स प्रीमिअर लीगचं आयोजन

आयपीएलच्या यशातून प्रेरणा घेत बीसीसीआयने महिलांसाठी वूमन्स प्रीमिअर लीगचं आयोजन सुरू केलं. २०१८ मध्ये आयपीएल दरम्यान महिला खेळाडूंचा एक सामना टी२० चॅलेंज म्हणून खेळवण्यात आला. पुढच्या तीन वर्षात असे तीन सामने आयपीएलदरम्यान खेळवण्यात आले. यामध्ये भारतासह जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंचा समावेश होता. या सामन्यांना मैदानावर आणि टीव्हीवरही उत्तम प्रतिसाद मिळाल्याने वूमन्स प्रीमिअर लीगला बळ मिळालं. २०२३ मध्ये वूमन्स प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उत्तर प्रदेश वॉरियर्स असे पाच संघ तयार करण्यात आले. प्रत्येक संघात किमान २० खेळाडू असतात. आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलसाठी लिलाव घेण्यात आला. महिला खेळाडूंसाठी कोटींच्या कोटी बोली लागल्या. बंगळुरूने स्मृती मानधनासाठी ३.४० कोटी रुपयांची बोली लावली. ज्या खेळाडूंविरुद्ध खेळायचं त्या संघसहकारी झाल्या. संवाद वाढला. त्यांची खेळाची, सरावाची पद्धत समजून घेता येते. कच्चे दुवे बळकट करता येऊ लागले तसंच हक्काच्या मैत्रिणी मिळाल्या. या स्पर्धेच्या निमित्ताने महिला प्रशिक्षक, अंपायर, सामनाधिकारी, समालोचक, निवेदक यांनाही संधी मिळाली. अनेक माजी खेळाडू समालोचक म्हणून काम करू लागल्या. वूमन्स प्रीमिअर लीग काळात जगभरातील अव्वल आजीमाजी खेळाडू भारतात तळ ठोकून असतात. यंदाच्या वर्षी डब्ल्यूपीएलचं मूल्यांकन १२७५ कोटी रुपये असल्याचं एका अहवालाद्वारे स्पष्ट झालं आहे. २०२४ मध्ये हाच आकडा १३५० कोटी रुपये होता. व्ह्यूअरशिपमध्ये मात्र सातत्याने वाढ होताना दिसत आहे. डब्ल्यूपीएल विजेत्या संघाला ६ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं.

जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्यास परवानगी

पुरुष खेळाडूंना आयपीएलव्यतिरिक्त जगातील अन्य कोणत्याही टी२० लीगमध्ये खेळण्यास अनुमती नाही. निवृत्त झाल्यानंतरच ते अन्य लीग खेळू शकतात. मात्र महिलांच्या बाबतीत बीसीसीआयने पवित्रा बदलला. यामुळे भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये नियमितपणे खेळू लागल्या. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा या बिग बॅश स्पर्धेतील संघाच्या अविभाज्य खेळाडू झाल्या आहेत. त्यांचे ऑस्ट्रेलियात चाहते आहेत. आर्थिक मुद्यापलीकडे भारतीय महिला खेळाडूंना ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळायची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ अतिशय व्यावसायिक पद्धतीने खेळतो. तिथे शिस्तबद्ध अशी क्रीडासंस्कृती आहे. भारतीय महिला खेळाडूंना ते जग अनुभवता आलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी संवाद होऊ लागला. ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने भारतीय खेळाडू आता इंग्लंडमधल्या द हंड्रेड स्पर्धेतही खेळतात.

सामन्यांचं थेट प्रक्षेपण आणि छोट्या शहरातला प्रतिसाद

वूमन्स प्रीमिअर लीगच्या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी बीसीसीआयने व्हायकॉम१८ कंपनीबरोबर पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांचा करार केला. हे सामने टीव्ही तसंच ओटीटीवर दिसू लागले. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता पण आता डब्ल्यूपीएलचे सामनेही क्रिकेटचाहते आवर्जून पाहतात. याबरोबरीने महिला संघाचे अन्य देशांविरुद्धच्या मालिकांचंही थेट प्रक्षेपण करण्यात येतं. यामुळे प्रत्येक खेळाडू टीव्हीवर दिसते. त्यांचा एक ब्रँड तयार होतो. लोकप्रियता वाढण्यात हा मुद्दा महत्त्वाचा असतो.नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर महिलांचे सामने नियमित आयोजित करण्यात येतात. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो. काही महिन्यांपूर्वीच या मैदानावर भारत-इंग्लंड महिला टेस्ट आयोजित करण्यात आली होती. सुरत इथल्या लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियममध्ये महिलांचे सामने आयोजित करण्यात येतात आणि त्याला प्रेक्षकांची भरभरून उपस्थिती असते.