WPL 2023 Prize Money Updates: महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL) चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात होणार आहे. ४ मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. ५ संघांच्या या लीगमध्ये अव्वल संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. त्याचबरोबर एलिमिनेटर दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबई आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. त्यात मुंबईने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आज आपण महिला प्रीमियर लीग २०२३ च्या बक्षिसाची रक्कम जाणून घेणार आहोत.

बक्षिसाची रक्कम १० कोटी आहे –

महिला प्रीमियर लीगच्या बक्षिसाची रक्कम १० कोटी रुपये आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार विजेत्या संघाला ६ कोटी रुपये मिळतील. म्हणजेच दिल्ली आणि मुंबईत जो संघ विजेतेपद मिळवेल, त्याला ६ कोटी रुपये दिले जातील. आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेत्या राजस्थान रॉयल्सला फक्त ४.८ कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या यूपी वॉरियर्सला बक्षीस म्हणून एक कोटी रुपये मिळतील.

पीएसएल चॅम्पियनपेक्षा जास्त पैसे मिळणार –

गेल्या आठवड्यात पाकिस्तान सुपर लीगचा म्हणजेच पीएसएलचा अंतिम सामना खेळला गेला. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदरने ते आपल्या नावावर केले. संघाला प्राइस मनी म्हणून केवळ ३.४ कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे अंतिम फेरीत पराभूत झालेल्या मुलतान सुलतानला केवळ १.३७ कोटींवर समाधान मानावे लागले. म्हणजेच बक्षीस रकमेच्या बाबतीत महिला प्रीमियर लीगने पाकिस्तान सुपर लीगला मागे टाकले आहे.

गट फेरीत समान गुण होते –

गट फेरीच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे १२-१२ गुण होते. दोघांनी ६-६ सामने जिंकले होते. या दोघांनी आपापल्या दोन सामन्यात १-१ असा विजय मिळवला. या कारणास्तव अंतिम सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

दोन्ही संघांचे स्कॉड –

दिल्ली कॅपिटल्स संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, एलिस कॅप्स, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, टीटा साधू, स्नेहा दीप्ती

मुंबई इंडियन्स संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हीदर ग्रॅहम, क्लोए ट्रायटन धारा गुर्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला