दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या वक्तव्याने सगळीकडेच खळबळ उडाली आहे. मैदानात ३६० डिग्री फटकेबाजी करणारा विस्फोटक फलंदाज म्हणून एबीची ओळख आहे. एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसला आहे. दरम्यान त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत मोठा खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) कडून खेळतानाचा अनुभव सांगताना त्याने खळबळजनक दावा केला आहे. त्याने म्हटले आहे की फ्रँचायझीची स्थिती वाईट होती आणि संघात अनेक वाईट लोक भरली होती. डिव्हिलियर्स २००८ ते २०१० पर्यंत दिल्लीचा भाग होता.
डिव्हिलियर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून २८ सामने खेळले आणि एक शतक आणि तीन अर्धशतकांसह सुमारे ७०० धावा केल्या होत्या. तो २०११ मध्ये आरसीबीच्या ताफ्यात सामील झाला आणि २०२१ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्याच संघाकडून खेळला. दिल्लीच्या संघात असताना एबी फक्त एकच हंगाम चांगला खेळला होता.
डिव्हिलियर्सने दिल्लीकडून खेळण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दल Cricket.com शी बोलताना सांगितले की, “मी कोणाची नाव घेत नाही. पण दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची परिस्थिती वाईट होती. संघात खूप विचित्र आणि तेढ पसरवणारी माणसं होती.”
संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. माझ्यासाठी ते क्षण अजूनच कडवट होते कारण मी माझे मुद्दे मांडायचो, बोलायचो. माझ्या सर्व चांगलं लक्षात आहे आणि मी माझ्या आयुष्यातील आणि करियरमधील काही महत्त्वाचे क्षण तिथे घालवले होते. ग्लेन मॅकग्रा आणि डेनियल विटोरीबरोबर वेळ घालवला होता, तिथेच माझी त्यांच्याशी चांगली ओळख झाली. हे दिग्गज माझे हिरो होते आणि मला त्यांची फार भिती वाटायची, असं पुढे सांगताना एबी म्हणाला.
एबी “मॅकग्रा यांच्याबद्दल सांगू तर, २००६ मध्ये मी त्यांच्याविरुद्ध एका कसोटीत खेळलो होतो आणि मी इतका घाबरलो होतो की श्वासही घेत नव्हतो खरंच आणि मी त्यांच्याशी एक शब्दही बोललो नाही. पुढच्याच क्षणी मी २००८ मध्ये एकदा बसलो होतो आणि ते माझ्या शेजारी बसले होते. ते मला म्हणाले की, तू ज्याप्रकारे खेळतोस ते मला प्रचंड आवडलं. मी अवाक् झालो आणि विचार करत होती की हे काय चाललंय.”
एबीने सांगितलं, “अशा काही कमाल क्षणांपासून ते संघात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांना पाहिलं आहे. नावं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच माझ्यासाठी ती ३ वर्ष खूप चढउतार असलेली होती. याचबरोबर मला जसा पाठिंबा हवा होता संघाकडून को मिळाला नाही.”
दिल्लीने रिटेन करणार सांगत अचानक रिलीज केल्याचा किस्साही एबीने सांगितला. “२००९ चा हंगाम छान होता. मी जवळजवळ संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळलो, परत आलो, मला वाटले की मी यी संघाचा मुख्य खेळाडू असेन. अचानक, परत मला खेळण्याची संधी दिली नाही. त्यामुळे खरोखरच संमिश्र भावना होत्या. मला सांगितले की मला रिटेन करण्यात येणार आहे आणि पुढच्याच क्षणी, मला समजलं की मी लिलावात आहे. मला काय झालं तेही कळले नाही. त्यामुळे अशा विचित्र गोष्टी घडल्या,” डिव्हिलियर्स म्हणाला.