Abhishek Sharma Highest Rating Points: आशिया चषक २०२५ स्पर्धेत युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पहिल्यांदाच मोठी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या अभिषेक शर्माने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. चौकार- षटकारांचा पाऊस पाडत त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला. यासह तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी देखील ठरला. दरम्यान या कामगिरीचा त्याला आयसीसी टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये चांगलाच फायदा झाला आहे. अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रेटींग पाँईंट्स मिळवणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं आहे.
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये कुठल्याही फलंदाजाला ९२० रेटींग पाँईंट्सचा आकडा देखील गाठता आलेला नाही. पण २५ वर्षीय अभिषेक शर्माने ९३१ रेटींग पाँईंट्सचा आकडा गाठला आहे. हा आकडा गाठणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीची सर्वोच्च रेटींग ९१९ होती. हा विक्रम इंग्लंडचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मलानच्या नावावर होता. आता अभिषेक शर्माने हा रेकॉर्ड तर मोडला,यासह असा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे ज्या रेकॉर्डपर्यंत पोहोचणं मुळीच सोपं नाही.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असताना ९१२ रेटींग पाँईंट्स मिळवले होते. तो सर्वाधिक रेटींग मिळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. ९०९ हे विराटने मिळवलेले सर्वोच्च रेटींग पाँईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच या यादीता पाचव्या स्थानी आहे.त्याने ९०४ रेटींग पाँईंट्स मिळवले होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. बाबरने ९०० रेटींग पाँईंट्सपर्यंत मजल मारली होती.
टी-२० क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माची दमदार कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक शर्माने जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरूवात केली होती. या मालिकेत त्याने दमदार शतक झळकावलं होतं. त्याला आतापर्यंत टी-२० आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १३५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. तर आयपीएल स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ७७ डावात १८१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ९ अर्धशतक झळकावले आहेत.