Ajinkya Rahane Playing XI For Asia Cup 2025: आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने संघाची निवड करताना काही धाडसी निर्णय घेतले आहेत. या संघात श्रेयस अय्यर आणि वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असलेल्या यशस्वी जैस्वालला स्थान देण्यात आलेलं नाही. तर या संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे असणार आहे. दरम्यान अजिंक्य रहाणेने संघात स्थान देण्यात आलेल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली आहे.
आशिया चषकासाठी अजिंक्य रहाणेने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११
अजिंक्य रहाणेने आपल्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून शुबमन गिल आणि अभिषेक शर्माची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या तिलक वर्माला स्थान दिलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. रहाणेने आपल्या प्लेइंग ११ मध्येही सूर्यकुमार यादवला चौथं स्थान दिलं आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी हार्दिक पांड्याची निवड केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने यष्टीरक्षक जितेश शर्माची निवड केली आहे. अजिंक्यने संजू सॅमसनला आपल्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलेलं नाही.
जितेश शर्माने आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. तर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने अक्षर पटेलला आपल्या संघात स्थान दिलं आहे.वेगवान गोलंदाज म्हणून त्याने या प्लेइंग ११ मध्ये अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्याने कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्तीची निवड केली आहे. रहाणेच्या मते, वरूण चक्रवर्ती किंवा हर्षित राणापैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.
अशी आहे अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी निवडलेली प्लेइंग ११
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती/हर्षित राणा