scorecardresearch

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : आता लक्ष्य जेतेपदाचे!; अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा बॅडमिंटनपटू; जिआवर मात

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली झी जिआविरुद्ध लक्ष्यने पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली. लोकसत्ता टीम

(संग्रहित छायाचित्र)

भारताच्या लक्ष्य सेनने चुरशीच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जिआवर २१-१३, १२-२१, २१-१९ असा विजय मिळवत ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद आणि सायना नेहवालनंतर या प्रतिष्ठेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा पाचवा भारतीय खेळाडू आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून २० वर्षीय लक्ष्यचा खेळ उंचावत आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक मिळवले होते. जानेवारीत त्याने ‘सुपर ५००’ इंडिया खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले, तर गेल्या आठवडय़ात जर्मन खुल्या स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली झी जिआविरुद्ध लक्ष्यने चांगली सुरुवात केली. आपल्याहून अनुभवी खेळाडूविरुद्ध खेळताना लक्ष्यने पहिला गेम २१ मिनिटांत २१-१३ असा जिंकला. लक्ष्यच्या फटक्यांचे जिआकडे उत्तर नव्हते. दुसऱ्या गेममध्ये जिआने जोरदार पुनरागमन करत ११-३ अशी भक्कम आघाडी घेतली. विश्रांतीनंतर जिआने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत गेम २१-१२ असा जिंकत सामना बरोबरीत आणला.

निर्णायक गेममध्ये लक्ष्यने सुरुवातीलाच ३-१ अशी आघाडी घेतली. पण, जिआने सामना ३-३ असा बरोबरीत आणला, यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये एकेका गुणांसाठी चुरस पहायला मिळाली. विश्रांतीपर्यंत जिआ ११-९ असा आघाडीवर होता. नंतर लक्ष्यने गुणांची कमाई करत जिआला चांगली टक्कर दिली. मग गेम १८-१८ असा बरोबरीत होता. लक्ष्यने सलग दोन गुण मिळवत २०-१८ अशी आघाडी घेतली. जिआने आणखीन एक गुण घेत आघाडी १९-२० अशी कमी केली. पण, लक्ष्यने निर्णायक गुणाची कमाई करत २१-१९ अशा फरकाने तिसऱ्या गेमसह सामनाही जिंकला. लक्ष्यचा खेळ पाहता आता सर्वाच्या नजरा रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागल्या आहेत.

५ प्रकाश नाथ (१९४७), प्रकाश पदुकोण (१९८०), पुलेला गोपीचंद (२००१) आणि सायना नेहवाल (२०१५) यांच्यानंतर ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा लक्ष्य हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. यापैकी पदुकोण आणि गोपीचंद यांनी जेतेपद पटकावले, तर नाथ आणि सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

२१ ऑल इंग्लंड स्पर्धेत गोपीचंद यांच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूने धडक मारली.

जिआविरुद्धच्या सामन्यात मी दडपणाखाली होतो. परंतु ही ऑल इंग्लंड स्पर्धा असल्यामुळे मी सर्व लक्ष खेळावर केंद्रित केले होते. शेवटी मला विजय मिळाला. सामना जिंकल्याने मी आनंदीत आहे. आता हा वेळ अंतिम सामन्याच्या तयारीला मला देता येईल. पहिल्या गेममध्ये माझ्याकडून उत्तम कामगिरी झाली. पण, दुसऱ्या गेममध्ये मी चुका केल्या. तिसऱ्या गेममधील शेवटच्या क्षणी मी आक्रमक खेळ करत विजय साकारला.  – लक्ष्य सेन

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All england badminton tournament overcoming seventh ranked world target in the finals akp

ताज्या बातम्या