महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत अखिल मराठी बुद्धिबळ संघटना विलीन!

डॉक्टर परिणय फुके यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी, तर सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्षपदी निवड

(परिणय फुके आणि सिद्धार्थ मयूर)

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने बोलविलेल्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेमध्ये अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे विलीनीकरण झाले. त्याचबरोबर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भंडाऱ्याचे डॉक्टर परिणय फुके यांची एकमताने निवड करण्यात आली. तर माजी अध्यक्ष पुण्याचे सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. सांगलीच्या अनिल ताडे यांची मुख्य कायदे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तसेच या सभेमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी पैकी २७ जिल्ह्यांतील जिल्हा बुद्धिबळ संघटनाना संलग्नता देण्यात आली.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कायदे सल्लागार निवडण्यासाठी आणि संलग्न जिल्हे निश्चित करण्यासाठी ही ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमध्ये दीर्घकाळ चाललेल्या आरोप, प्रत्यारोप, कोर्ट कचेरीच्या वादानंतर ४ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली यामध्ये संजय कपूर व भरतसिंग गटाची सरशी झाली होती. यानंतर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नव्या कार्यकारिणीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला संलग्नता दिली. अध्यक्ष संजय कपूर व सचिव भरतसिंग चव्हाण यांनी अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेला, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत विलीन करून घेऊन दोन्ही संघटनानी एकत्र काम करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही संघटनेने त्रिसदस्यीय समिती नेमून विलीनीकरण प्रक्रीया यशस्वीरित्या राबविली.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार नरेश शर्मा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तर सचिव भरतसिंग चव्हाण यांना खास मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी विलिनीकरण प्रक्रियेची प्रशंसा केली व पाच वर्षे दोन संघटनेत चालु असलेला वाद मिटल्यामुळे समाधान व्यक्त करून, नवीन अध्यक्ष व कार्याध्यक्षांचे अभिनंदन केले व त्यांना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेस शुभेच्छा दिल्या. या दोन संघटनेचे झालेले एकत्रीकरणचा फायदा महाराष्ट्रच्या बुद्धिबळाच्या विकासासाठी निश्चित होईल, असे मत नूतन अध्यक्ष डॉक्टर परिणय फुके व कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर यानी व्यक्त केले.
संघटनेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ जैन उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, गिरीश चितळे, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सचिव निरंजन गोडबोले यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन हिशोब सादर केला व शेवटी सर्वांचे आभार मानले.राज्यातील विविध जिल्हा संघटनेचे मिळून जवळजवळ ७० प्रतिनिधी या ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: All marathi chess association merged with maharashtra chess association msr

ताज्या बातम्या