२०१९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. शिखर धवनपाठोपाठ, अष्टपैलू विजय शंकरदेखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. या दोन्ही खेळाडूंच्या बदल्यात टीम इंडियात ऋषभ पंत आणि मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेआधी टीम इंडियाकडून आश्वासक कामगिरी करणाऱ्या अंबाती रायुडूकडे निवड समितीने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. हीच संधी सोधत Iceland क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. Iceland देशाचं नागरिकत्व स्विकारण्यासाठी कोणत्या कादगपत्रांची गरज लागते, याची माहितीही Iceland क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

या ट्विटमध्ये Iceland क्रिकेटने मयांक अग्रवाल आणि अंबाती रायुडूच्या कामगिरीची तुलना करत, आमच्या संघाकडून खेळ अशी ऑफर रायुडूला दिली आहे. याचसोबत मध्यंतरी रायुडूच्या थ्री-डी गॉगलच्या ट्विटचा संदर्भ देत Iceland क्रिकेटने BCCI ला टोला लगावला आहे.

Iceland क्रिकेटने केलेल्या या ट्विटवर काही चाहत्यांनी रायुडूला संघात स्थान मिळायला हवं होतं अशा आशयाच्या प्रतिक्रीया देत समर्थन केलं आहे. तर काही चाहत्यांनी Iceland क्रिकेटच्या या खोडसाळ ट्विटला जशास तसं उत्तर दिलं आहे. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्याआधी अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने विजय शंकरला पसंती दिली होती. तोच विजय शंकर दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर अंबाती रायुडूला संधी न देता मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आलं आहे.