अनेक दिग्गज खेळाडूंची अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मांदियाळी असली, तरी यजमान अमेरिकेचा जॉन इस्नेर या एकमेव खेळाडूला पुरुष गटात मानांकन मिळाले आहे. त्याच्याकडून अमेरिकेला खूप आशा आहेत.
या स्पर्धेत इस्नेरने अंतिम फेरीपर्यंत स्थान मिळवावे, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याने नुकत्याच झालेल्या सिनसिनाटी खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली होती. अमेरिकन स्पर्धेत पीट सॅम्प्रस व जॉन मॅकेन्रो यांनी अनेक वर्षे वर्चस्व गाजविले होते. मात्र अँडी रॉडिकनंतर एकाही अमेरिकन खेळाडूला ही स्पर्धाजिंकता आलेली नाही.
विम्बल्डनमध्ये  ऐतिहासिक अजिंक्यपद मिळवणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरेला अमेरिकन स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे. माजी विजेता रॉजर फेडररला सातवे मानांकन असून त्याचाही प्रवास खडतर राहणार आहे. राफेल नदाल व नोव्हाक जोकोव्हिच यांच्या कामगिरीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.