भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आर अश्विनने अचानक ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान निवृत्ती जाहीर केली होती. आर अश्विननंतर आता भारताच्या अजून एका क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या भारतीय क्रिकेटपटूने वयाच्या ४२व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे.

अमित मिश्राने गुरुवारी एक प्रेस रिलीज जारी करत निवृत्तीची घोषणा केली. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटलं आहे. आता तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळणार नाही. पण तो इतर देशांच्या टी-२० लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. अमित मिश्रा त्याच्या निवृत्तीमागील कारणही सांगितलं आहे.

अमित मिश्रा प्रेस रिलीजमध्ये म्हणाला, “क्रिकेटमधील माझी ही २५ वर्षांची कारकिर्द खूपच अविस्मरणीय ठरली. या प्रवासात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या बीसीसीआयचे, प्रशासनाचे, हरियाणा क्रिकेट संघटनेचे, माझ्या पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या सपोर्ट स्टाफचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो. त्यांचा पाठिंबा नसता, तर हा प्रवास इतका सुंदर आणि यशस्वी झाला नसता.

मी ज्या ज्या ठिकाणी खेळलो आणि तिथे मला चाहत्यांचा मिळालेला पाठिंबा आणि प्रेम या प्रवासाला अधिक अविस्मरणीय बनवून गेला, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. क्रिकेटने मला असंख्य आठवणी दिल्या, अमूल्य शिकवण दिली. मैदानावरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल आहे आणि तो मी आयुष्यभर जपून ठेवेन.”

अमित मिश्राने २००३ मध्ये बांग्लादेशमधील तिरंगी मालिकेत वनडेमध्ये पदार्पण केलं. यानंतर २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोहाली येथे झालेल्या सामन्यात त्याने पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. २०१३ मध्ये त्याने झिम्बाब्वेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक १८ विकेट्स घेत जवागल श्रीनाथ यांच्या विश्वविक्रमाची त्याने बरोबरी साधली.

२०१४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक संघाचा भाग होता, ज्यात त्याने १० विकेट्स घेतल्या होत्या. २०१७ मध्ये अमित मिश्रा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने खेळत होता. अमित मिश्राने आयपीएल २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्स वि. राजस्थान रॉयल्स या सामन्यात अखेरचा खेळताना दिसला होता.

अमित मिश्राने प्रेस रिलीज शेअर केल्यानंतर आता काही वेळाने त्याने पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यामध्ये त्याने भारताची जर्सी आणि हातात ट्रॉफी असलेला फोटो शेअर केला आहे आणि सर्वांचे आभार मानले आहेत.

अमित मिश्रा निवृत्ती: आयपीएलमधील तीन हॅटट्रिक

अमित मिश्राने आयपीएलमध्ये १६२ सामन्यांमध्ये १७४ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. याशिवाय आयपीएलमध्ये ३ हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. अमित मिश्राने २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, २०११ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि २०१३ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना हॅटट्रिक घेतली होती.