इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्ध १ मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तो इंग्लंड संघाचा भाग आहे. दुखापतीमुळे तो ९ महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर होता. महमूदने मार्च २०२२ मध्ये इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळला होता. संघात परतल्यानंतर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यावरुन तो चर्चेत आला आहे.

साकिब महमूदने ट्विटर अकाऊंटवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीतील काही खास क्षण आहेत. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाठीच्या दुखापतीमुळे ९ महिन्यांहून अधिक काळ खेळापासून दूर होतो. इंग्लंड संघात पुन्हा पुनरागमन करताना खूप छान वाटत आहे. मी हे खूप मिस केले.”

साकिब महमूदची ट्विटर पोस्ट

महमूदच्या पुनरागमनवर त्याचे चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. त्याच वेळी, वेगवान गोलंदाजाला त्याच्या व्हिडिओवर द्वेषपूर्ण टिप्पणीलाही सामोरे जावे लागले. मेहमूदला ट्रोल करणाऱ्या एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये ‘आणखी एक जिहादी’ असे लिहिले आहे. मात्र, मेहमूदने ट्रोलला सोडले नाही, तर केवळ एका शब्दाने त्याला गप्प केले. गोलंदाजाने प्रत्युत्तरात लिहिले, ‘इडियट.’

Saqib Mahmood reply troller
साकिब महमूदचा रिप्लाय (फोटो-ट्विटर)

महमूदने २०१९ मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत इंग्लंडसाठी २ कसोटी, ७ एकदिवसीय आणि १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ६, १४ आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; २०० हून अधिक बळी घेणारा ‘हा’ प्रमुख गोलंदाज बाहेर

बांगलादेश मालिकेसाठी इंग्लंडचा संघ: जोस बटलर (कर्णधार), टॉम एबेल, रेहान अहमद, मोईन अली, जोफ्रा आर्चर, सॅम करन, साकिब महमूद, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रीस टोपली, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड.