भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० विकेट घेतल्या, तेव्हा काही वर्षांनी असे दृश्य पुन्हा पाहायला मिळेल असे क्वचितच कुणाला वाटले होते. पण आज न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने ही किमया केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजाजने १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली. एजाजच्या या भीमपराक्रमानंतर अनिल कुंबळेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुंबळेने ट्वीट करत एजाजचे अभिनंदन केले. तो म्हणाला. ”एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.” १९९९मध्ये अनिल कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते.

हेही वाचा – IND vs NZ : एकच छावा..! ‘मुंबईकर’ एजाज पटेलनं भारताला गुंडाळलं; १० विकेट्स घेत कुंबळेसोबत मानाचं स्थान मिळवलं!

विशेष म्हणजे भारतीय संघाने केलेल्या विक्रमाची पुनरावृत्ती भारताविरुद्धच झाली. १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात एका डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा जगातील फक्त तिसरा गोलंदाज आहे. कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटीच्या एका डावात १० बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती.