क्रिकेट आणि बॉलीवूड जगतातील अनेक जोडपी आपण पाहिली आहेत. पण त्यापैकी विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी खूपच प्रसिद्ध आहे. विराट-अनुष्का सर्वाधिक फॉलो केलं जाणारं सेलिब्रिटी कपल आहे. विराट-अनुष्काच्या जोडीला चाहते विरूष्का म्हणतात. विराट अनुष्काने २०१७ मध्ये लग्न केलं आणि आता दोघांनाही दोन मुलं आहेत. अनुष्काने आता विराट कोहलीसह लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये दोघांनीही इटलीमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. अनुष्का आणि विराटची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली आणि इथूनच त्यांचे लव्हस्टोरीला सुरूवात झाली. आता अनुष्का शर्माने विराट कोहलीशी लग्न करण्याचे कारण सांगितले आहे.
चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना विराट कोहलीशी लग्न केलं. त्यावेळी अनुष्का शर्मा २९ वर्षांची होती. सहसा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या करिअरमुळे लवकर लग्न करणं टाळतात, परंतु अनुष्काने ही विचारसरणी मोडून प्रेमाला प्राधान्य दिले.
एका मुलाखतीत अनुष्काने तिच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितले. तिने म्हटलं की, चाहते खूप समजूतदार आहेत. तुम्ही विवाहित आहात की आई आहात हे त्यांना महत्त्वाचे नाही, जोपर्यंत तुम्ही पडद्यावर चांगले काम करत आहात तोपर्यंत चाहते तुम्हाला पाठिंबा देत राहतील. अनुष्का म्हणाली, “मी २९व्या वर्षी लग्न केलं, जे या इंडस्ट्रीमध्ये खूप तरूण वयात लग्न केलं असं मानलं जातं. पण मी लग्न केलं कारण मी प्रेमात पडली होती आणि मी अजूनही प्रेमात आहे.”

विराट आणि अनुष्का हे आजच्या काळातील एका पॉवर कपलचे उदाहरण आहेत. त्यांची केमिस्ट्री, एकमेकांबद्दलचा आदर आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे हाताळायचं, या त्यांच्या गोष्टी चाहत्यांना भावतात. दोघांचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली आहेत आणि या जोडप्याला दोन मुलं आहेत. मुलगी वामिका (११ जानेवारी २०२१) आणि मुलगा अकाय (१५ फेब्रुवारी २०२४).
विरूष्का फारसे कधी सर्वांसमोर येत नसले तरी जेव्हा जेव्हा ते एकत्र दिसतात तेव्हा ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. विराट आणि अनुष्का दोघेही आपलं करियर सांभाळत एकत्र राहत आहेत. या दोघांची सोशल मीडिया पोस्टही व्हायरल होते.